पैसे दिल्याशिवाय पीआर कार्ड मिळत नाही; भ्रष्ट कर्मचार्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही
बीड (रिपोर्टर): तहसील कार्यालयामध्ये असलेल्या भुमिअभिलेख कार्यालयात प्रचंड अनागोंदी कारभार सुरू आहे. पीआर कार्ड काढण्यासाठी नागरीकांना पैसे मोजावे लागतात. पैसे दिले तरच संबंधीत भ्रष्ट कर्मचारी पीआर कार्ड देतात नाही तर उडवाउडवीची उत्तरे देत पीआर कार्ड देत नाहीत सदरील हे कार्यालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतं. या कार्यालयातील सर्व कर्मचार्यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील नगररोडवर असलेल्या तहसील कार्यालयामध्ये भुमिअभिलेख कार्यालय आहे. या कार्यालयातून पीआर कार्ड काढले जाते. नियमानुसार पीआर कार्ड काढण्यासाठी फक्त दीडशे रुपये फिस आहे. मात्र या दीडशे रुपयामध्ये कधीच कोणाला कार्ड मिळाले नाही. पीआर कार्ड काढण्यासाठी अनेकांनी कार्यालयामध्ये अर्ज दाखल केलेले आहेत. जे जास्तीचे पैसे देतील त्यांचे कार्ड नियमबाह्य पद्धतीने काढून दिले जाते आणि ज्यांनी नियमाची भाषा केली त्यांचे कार्ड अनेक महिने ताटकळत ठेवण्याचे काम केले जात आहे. सदरील कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डाच झाला आहे. येथील कर्मचारी नागरीकांची लूट तर करतच आहेत. वरून कार्यालयात कसल्याही प्रकारचा अवमेळ नाही. कोणी कधीही येतयं आणि कधीही जातयं, सदरील कार्यालयातील सर्व कर्मचार्यांची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करण्याचे आदेश द्यावे आणि पीआर कार्डच्या नावाखाली नागरीकांची लूट करणार्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.