पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल, त्या वाळु टिप्परचा शोध सुरू, सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता
बीड (रिपोर्टर) बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे या औरंगाबादहून बीडकडे येत असताना मध्यरात्री विना नंबरच्या वाळुच्या टिप्परने कलेक्टरांच्या गाडीला कट मारला आणि टिप्पर पसार झाले. या दरम्यान कलेक्टरांच्या गाडीने वाळुच्या गाडीचा पाठलाग केल्याचे समजते. सदरची घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणी कलेक्टरांनी थेट एसपींना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. गुन्हे अन्वेषण विभागासह गेवराई पोलीस संबंधित टिप्परचा शोध मादळमोही हिंगणी हवेलीसह परिसरामध्ये घेत आहेत. या प्रकरणी कलेक्टर यांचे बॉडीगार्ड रितसर तक्रार देणार असल्याची माहिती हाती आली आहे.
मध्यरात्रीच्या दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुंडे या आपल्या गाडीने औरंगाबादहून बीडकडे येत होत्या. त्यांच्या सोबत चालकासह बॉडीगार्ड होते. पाडळसिंगी परिसरामध्ये विनानंबरच्या एका वाळुच्या टिप्परने कलेक्टरांच्या गाडीला कट मारला. त्यानंतर कलेक्टरांच्या गाडीने संबंधित वाळुच्या गाडीचा काही काळ पाठलागही केला. मात्र पाडळसिंगी जवळच्या एका सर्व्हीस रोडवर टिप्पर चालकाने आपली गाडी घातली. रस्त्याच्या मध्यभागी गाडीमधील वाळू रस्त्यावर टाकून टिप्पर चालक तेथून पसार झाला. रस्त्यावर वाळू पडल्याने कलेक्टरांच्या गाडीला त्याचा पाठलाग करता आला नाही. सदरची घटना अत्यंत गंभीर आहे, बीड जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद् मांडला आहे. आता थेट कलेक्टरांच्या गाडीला वाळू माफियांनी लक्ष केल्याने याची गंभीर दखल यंत्रणेने घेतली आहे. सदरचे वाळू टिप्पर शोधण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागासह गेवराई पोलीस पाडळसिंगी, मादळमोही, हिंगणी हवेली आदी परिसरामध्ये शोध घेत आहेत. या प्रकरणी आम्ही जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदरची घटना घडली असून संबंधित टिप्पर चालकाचा शोध पोलीस घेत आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.