मुंबई: राज्यातील सत्तेत एकत्र असणार्या भाजप आणि शिंदे गटात वरुन सर्व आलबेल दिसत असले तरी दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे संकेत मिळत आहेत.स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले शिंदे गटाचे ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या 13 खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे कीर्तिकर यांनी म्हटले आहे. आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. आमचा शिवसेना पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असल्याप्रमाणेच आमची कामं झाली पाहिजेत. मी हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडला. भाजपकडून आम्हाला घटकपक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला वागवले गेले पाहिजे. पण भाजपकडून आमच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळते, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भातही भाष्य केले. लोकसभेच्या 22 जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही. 2019 साली शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावापट झाले तेव्हा आम्ही 23 तर भाजपने 26 जागा लढवल्या. यापैकी 22 जागांवर भाजपचे आणि 18 जागांवर आमचे खासदार निवडून आले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हेच सूत्र राहील. त्यादृष्टीने आमची तयारी झाली आहे, असा दावाही गजानन कीर्तिकर यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीप्रमाणे भाजप-शिंदे गटातही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण, शिंदे गटाने लोकसभेच्या 22 जागा लढवण्यासाठी तयारी सुरु केल्याची माहिती आहे. मात्र, आक्रमकपणे आपल्या पक्षाचा विस्तार करणार्या भाजपला ही बाब कितपत मान्य होईल, हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शिवसेनेच्या 13 खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली 2019 मध्ये लढवलेल्या 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला आहे. 13 खासदार हे सध्या शिवसेनेसोबत (शिंदे गट) आहेत. तर उर्वरित खासदार ठाकरे गटासोबत असून या जागांचा आढावा घेतला जाईल. लोकसभेच्या या 22 जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. मात्र, आता भाजप यावर काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.