मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला विरोध नाही. परंतु याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे. ती झाकून सावरकर यांचा पुतळा लावला गेला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहेत. त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. ही घटना मनाला दुःख देणारी आहे, या प्रकरणी आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली.
नाशिक येथील कार्यालयात भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनात मोठ्या हॉलची व्यवस्था असताना कार्यक्रम तिथे का घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे व हा मूर्खपणा कुणी केला त्याच्यावर कारवाई करावी. पुतळे हटविण्याचे काम का केले, जाणीवपूर्वक हे केले का हे शोधावे, असे आवाहन त्यांनी केले.