बीड (रिपोर्टर) जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत निवडणूक विभागाला सादर न करणार्या 214 ग्रा.पं. सदस्यांवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी अपात्रतेची कारवाई केल्याने एकीकडे खळबळ उडाली असतानाच दुसरीकडे निवडणूक विभागाचा भोंगळ कारभारही समोर आला आहे. बीड तालुक्यातील नागापूर (बु.) येथील चार सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. परंतु संबंधित चारही सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक विभागाला मुदतीत दिल्याचे दिसून येत असून या कारवाईत मयत सरपंचालाही अपात्र करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या जागी पोटनिवडणूक होऊन निवडणूक विभागाने नव्या सदस्याला प्रमाणपत्रही दिले आहे.
बीड निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार उघड
नागापूर (बु.) येथील जात पडताळणी प्रमाणपत्र देणार्यांनाही केले अपात्र
याबाबत अधिक असे की, 2021 साली बीड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये बीड तालुक्यातील नागापूर (बु.) येथील ग्रामपंचायतीचाही सहभाग होता. त्या 214 ग्रा.पं.सदस्यांबरोबर नागापूर (बु.) येथील किशोर नरहरी ढोकणे (विद्यमान सरपंच), भरत जालिंदर साळुंके, सीमा रामप्रसाद साळुंके व रुपा सुखदेव ढोकणे या चौघांना अपात्र करण्यात आले आहे, विशेष म्हणजे या चारही जणांनी जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीच्या आत निवडणूक विभागाकडे सादर केले आहे. त्याची पोचपावती संबंधित सदस्यांकडे आहे. विशेष म्हणजे यामध्ये रुपा सुखदेव ढोकणे यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या जागेसाठी नागापूर (बु.) या ठिकाणी निवडणूक विभागाने पोटनिवडणूक घेतली. या पोटनिवडणुकीत ज्योती सिद्धार्थ ढोकणे या निवडूनही आल्या. त्या निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र निवडणूक विभागाने त्यांना दिलेही. एवढी सर्व कार्यवाही झाल्यानंतरही कालच्या अपात्रतेमध्ये नागापूर (बु.) येथील तत्कालीन मयत सरपंच रुपा सुखदेव ढोकणे यांनाही अपात्र करण्यात आले आहे. निवडणूक विभागाचा हा भोंगळ कारभार काल ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केल्यानंतर समोर आला आहे. ज्या गावात निवडणूक विभाग मयताच्या जागेवर निवडणूक घेते, विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र देते, ही सर्व कार्यप्रणाली पुर्ण झाल्यानंतरही निवडणूक विभागाला या उमेदवारांचे जात पडताळणी प्रमाणपत्र आपल्याकडे आहे की नाही हे माहित नसावे हे दुर्दैव.