बीड (रिपोर्टर) किरकोळ कारणावरून होत असलेल्या वाद-विवादात मोठ्या प्रमाणावर जमाव जमतो आणि त्या त्या भागात तणाव निर्माण करतो, अशा घटना सातत्याने बीड शहरात घडताना दिसून येत आहेत. सदरची बाब अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे, अशा परिस्थितीत आपल्या भागामध्ये कुठे असे वादविवाद निर्माण झाले तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, घटनास्थळावर जमावाने जमा न होता वाद वाढणार नाही, तणावाची स्थिती होणार नाही याकडे लक्ष द्यावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवि सानप यांनी केले.
गेल्या आठ-पंधरा दिवसांच्या कालखंडात बीड शहरातील काही भागांमध्ये दोघा व्यक्तीत छोट्या मोठ्या कारणावरून वादविवाद झाल्याचे दिसून आले. घटनास्थळावर कारण नसताना जमाव जमत गेला आणि अफवांना पेव फुटले. हे नुसते दुर्दैवीच नव्हे तर अफवा पेरणे हे कायद्याने गुन्हा आहे. खरे पाहिले तर दोघात वाद झाल्यानंतर एकतर तो उपस्थित चार चौघांनी तात्काळ मिटवायला हवा, नसता थेट पोलिसांना फोन करायला हवा. परंतु कारण नसताना अशा काही घटना घडल्या की, मोठ्या प्रमाणावर जमाव जमतो. यातून एखादा अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता असते, त्यामुळे नाहक जमावामध्ये जमा झालेले लोक प्रामुख्याने तरुण वर्ग यांच्यावर जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा भविष्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल, पासपोर्ट असेल, शिक्षणाबाबत अथवा नोकरी बाबत यामुळे अडचणी निर्माण होतात. बीडची जनता सुजान आहे, सामाजिक तेढ निर्माण होईल, असे कुठलेही कृत्य कोणीही करणार नही, हा विश्वास असला तरी भविष्यात यदाकदाचित किरकोळ वाद झालेच तर सुजान जनतेने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. जमावाने न जमता आपल्या भविष्याचा विचार करावा, असे आवाहन बीड शहर पोलीस ठाण्याचे पीआय रवि सानप यांनी केले आहे.