आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना, रात्रीतून काही ठिकाणी छापासत्र, काही शस्त्रे सापडल्याची माहिती, रेकॉर्डवर एक ताब्यात, सहापेक्षा जास्त जणांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्याची माहिती
बीड (रिपोर्टर): वाळू, गुटखा, भूमाफियांचा सेटिंग आणि धतिंगचा धंदा तेजित आणण्यात हेतु थेट बळाचा वापर माफियांकडून होत असल्याने कधी नव्हे ते बीडमध्ये गँगवॉर पहावयास मिळत असून रात्री बीड शहरात झालेल्या गँगवॉरने शहर दहशतीखाली आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गंभीर पावले उचलले असून रात्रीपासून या प्रकरणात अडकलेल्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी दोन पथकांची रवानगी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी छापेसत्र सुरू ठेवून तेथून काही शस्त्रेही पोलिसांनी जप्त केल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. रात्रीच्या गँगवॉर प्रकरणात दस्तुरखुद्द जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या अदोशावरून शासनामार्फत पोलीस फिर्यादी झाले असून तब्बल 40 ते 45 जणांवर 307 सह अन्य स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस रेकॉर्डवर एकजण ताब्यात असल्याचे सांगण्यात येते मात्र पोलिसांनी दुपारपर्यंत सहापेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतल्याचे सुत्रांचे सांगणे आहे.
पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून गायकवाड विरुद्ध जाधव असे गँगवॉर बीड शहराच्या चर्हाटा रोड, कालिकानगर भागात घडली. गायकवाड गटाकडून थेट जाधव गटावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरात जाधव गटाने गायकवाड गटावर तलवारीने हल्ले चढविले. यात चारपेक्षा अधिक जण दोन्ही गटाचे जखमी असून जखमींना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. बीडमध्ये गँगवॉर घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुटखा, वाळू आणि भूमाफिये गुन्हेगारी स्वरुपाच्या वृत्तीच्या लोकांना हाताशी धरून दहशत माजवत असल्याची तक्रार याआधी अनेक वेळा होती.
पोलिसांचे दुर्लक्ष त्यातून रात्रीचे गँगवॉर घडल्याचे काहींचे म्हणणे आहे. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घेऊन रात्रीच यातील दोषींना आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना केले आहे. काही ठिकाणी पोलिसांनी छापासत्र सुरू ठेवले आहे. रात्रीतून या छापासत्रात काही शस्त्रे पोलिसांनी जप्त केल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. मात्र पोलिसांकडून एक गावठी कट्टा आणि तलवार ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. आणखी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या घरातून मिळाल्याचे बोलले जातेय. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक अमोल गणेश गुरले (वय 33 वर्षे) यांच्या फिर्यादीवरून आसाराम जगन्नाथ गायकवाड, विपुल आसाराम गायकवाड, अमर आसाराम गायकवाड, ऋषी आसाराम गायकवाड, मारोती जगन्नाथ गायकवाड, संभा मारुती गायकवाड, बल्ल्या मारुती गायकवाड, निखिल सपकाळ, संतोष सुरेश जाधव, निलेश सुरेश जाधव, सुरेश रामलाल जाधव, प्रदीप विष्णू गायकवाड, दीपक विष्णू गायकवाड, विष्णू रामभाऊ गायकवाड, अशोक गायकवाड, परसराम गौतम गायकवाड, प्रवीण गौतम गायकवाड, सुभाष चंद्रकांत जाधव, सुमित कोळपेसह इतर 15 ते 20 जणांविरोधात भा.दं.वि. कलम 160, 323, 324, 307, 143, 147, 148, 149, 504 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व 4/25 तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांचे आदेश जा.क्र. 23/2023 / गृहविभाग / प्र.कारवाई/1/1 मपोका 1951 कलम 37 (1) (3) अन्वये दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून कलम 135 मपोका अनुसार फिर्याद देऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली वाढवल्या असून काहींना ताब्यात घेतल्याचे बोलले जातेय.
पोलिसांना करावा लागला बळाचा वापर; जमावावर सौम्य लाठीमार
रात्री दोन गटात तुंबळ सशस्त्र मारामार्या रोखण्यासाठी बीड पोलिसांना घटनास्थळासह जिल्हा रुग्णालयातही जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. उपस्थित जमावावर यातील फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक अमोल गणेश गुरले व पो.उपनि. पाथरकर यांच्यासह एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे रात्रीचा अनुचीत प्रकार आटोक्यात आला.
मिटवा मिटवी होते म्हणून आम्ही स्वत: फिर्यादी -एसपी ठाकूर
रात्रीचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. कायदा हातात घेणार्याची गय केली जाणार नाही. काल दोन गटामध्ये वाद झाला. मारामार्या जाल्या, ते दोघेही एकमेकांविरोधात फिर्याद देत होते मात्र त्या दोघांच्या वादामध्ये शहरात दहशत पसरली. ते दोघे नंतर एक होतात आणि मिटवून घेतात म्हणून आम्ही स्वत: या घटनेमध्ये फिर्यादी होत गुन्हा दाखल केल्याचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटले.