अनेक शेळ्या जखमी; घटनास्थळावर शेळ्यांच्या रक्तमांसाचा चिखल
बीड (रिपोर्टर) भरधाव वेगात येणार्या पिकअपने रस्त्यावरून जाणार्या शेळ्यांच्या कळपात पिकअप घातल्याने एकोणीस शेळ्या चिरडून जागीच ठार झाल्या तर सहा शेळ्या गंभीर जखमी असून सदरची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आहेरवडगाव फाट्याजवळ घडली. सदरच्या अपघाताने अपघातस्थळावर शेळ्यांच्या रक्तमांसाचा चिखल पहावयास मिळाला. हृदय हलावून टाकणार्या या अपघाताने शेळी मालकाचे मोठे नुकसान केले.
याबाबत अधिक असे की, शंकर खरात (रा. आहेरवडगाव) हे आपल्या 50 शेळ्यांच्या कळपाला घेऊन रस्त्याच्या कडेने शेळ्या चारण्यासाठी निघाले होते. अकरा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात येणारा पिकअप शेळ्यांच्या कळपामध्ये घुसला. अवघ्या काही क्षणात कित्येक शेळ्या पिकअपच्या चाकाखाली आल्या. त्यामध्ये एकोनीस शेळ्या चिरडून जागीच ठार झाल्या. तर अन्य बहुतांशी शेळ्या या जखमी झाल्या. यामध्ये सहा शेळ्या गंभीर जखमी असून त्या मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती प्रथमदर्शींनी दिली. सदरचा पिकअप हा बीडवरून नेकनूर बाजारासाठी जात असल्याचे सांगण्यात आले. अपघात एवढा भयानक होता की, घटनास्थळावर शेळ्यांच्या रक्तमांसाचा चिखल पहावयास मिळाला. शेळ्याचा मालक शंकर खरात याने अपघात घडल्यानंतर पिकअप चालकाला पिकअपसह ताब्यात घेऊन ठेवले. या घटनेची माहिती तात्काळ बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली मात्र दिंडी बंदोबस्ताचे कारण सांगून या गंभीर अपघाताकडे पोलिसांनी काही काळ दुर्लक्ष केले. अपघात घडल्यानंतर घटनास्थळावर तब्बल एक ते दोन तासांनी पोलीस पोहचले. शेळी मालकाने ताब्यात घेतलेल्या पिकअप चालकासह पिकअपला ते घटनास्थळावरून घेऊन गेले. या अपघाताने शेळी मालक शंकर खरात यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.