बीड (रिपोर्टर): स्व. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला. आर्थिक निकषावर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मात्र हे आरक्षण देताना अनुसुचीत जाती आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. केंद्र सरकार समान नागरी कायदा आणण्याच्या विचारात आहे, या समान नागरी कायद्यालाही रिपाइंचा पाठिंबा आहे, या समान नागरी कायद्याबाबत मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. हा समान नागरी कायदा लागू करताना त्यांच्यातील संभ्रम दूर केला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले.
ते आज बीड येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते. या वेळी रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राजाभाऊ सरवदे, राजू जोगदंड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. स्व. विनायक मेटे यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये अभिवादन करण्यासाठी रामदास आठवले हे बीड येथे आले आहेत. आठवले पुढे बोलताना म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गरीबांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. मोदी सरकार हे संघाच्या दबावाखाली काम करत असून ते राज्य घटना बदलण्याचे षडयंत्र करत आहेत, मात्र मी मोदींच्या मंत्रिमंडळात काम करत आहे, त्यामुळे ते कदापीही राज्य घटना बदलणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्य घटना ही जगात आदर्शवादी राज्य घटना असून भारतातील लोकशाही या राज्य घटनेमुळे सुदृढ झालेली आहे. विरोधी पक्ष सर्वजण एकत्रित झाले तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एनडीएच सत्तेवर येणार आहे. त्यांच्या एकत्र येण्यामुळे एनडीएला काहीही फरक पडणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना 8 लाखांपर्यंत ज्या मराठा कुटुंबाचे उत्पन्न आहे अशा मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्यासाठी रिपाइंचा नेहमीच पाठिंबा आहे. मात्र ओबीसींचे 27 टक्के आरक्षण हे मराठा समाजाला आरक्षण देताना अबाधित राहीले पाहिजे, असेही आठवले या वेळी म्हणाले. अनुसुचीत जाती जमातीच्या योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असल्या तरी राज्य सरकारकडून या योजनांना गती मिळत नाही. अनुसुचीत जातीसोबत इतर भूमीहिन जाती-जमातींनाही राज्य सरकारने बाजार भावाप्रमाणे शेती खरेदी करून पाच एकर शेतीचे पट्टे वाटप केले पाहिजे, सध्या अस्तित्वात असलेली दादासाहेब सबलीकरण ही योजना चुकीच्या पद्धतीने राबवली जात आहे त्यामुळे त्या योजनेखाली भूमिहिनांना शेती मिळत नाही. दोन दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकार सोबत असलेल्या सर्व पक्ष आणि आघाड्यांची बैठक झाली असून या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. त्यात त्यांनी रिपाइंला सत्तेत सहभागी करून घेण्याचे वचन दिले असून लवकरच रिपाइंच्या वाटेला एक विधान परिषदेची जागा येणार आहे, असेही या वेळी आठवले यांनी म्हटले.
संभाजी भिडेंचे वय झाले आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा
संभाजी भिडे यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले असून त्यात त्यांनी भारताचा राष्ट्रध्वजातील पांढरा आणि हिरवा कलर हा आम्हाला आवडत नसून भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा करावा, असे विधान केले आहे. त्यावर आठवले म्हणाले की, त्यांच्या विरोधात कोणी तरी तक्रार दाखल करावी, जेणेकरून या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करता येईल. संभाजी भिडेंचे वय 80 च्या पुढे लोटले असून त्यांची बुद्धी आता नाटी झाली आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे.
दलित पँथर स्थापन करण्याचा विचार
एकेकाळी महाराष्ट्रात दलित पँथरचा प्रचंड दबदबा होता. या पँथरमुळे समाजाला न्याय मिळत होता. त्यांच्यावर अन्याय होत नव्हता. म्हणून मी प्रत्येक वेळेस समाजातून आणि युवकातून पुन्हा दलित पँथरची स्थापना करावी, अशी मागणी होत आहे. मी याबाबत राज्यभरात फिरणार असून समाजातील विचारवंतांसोबत आणि युवकांसोबत बैठका घेऊन दलित पँथर स्थापन करण्याचा विचार करत आहे. या दलित पँथरमुळेच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळाले.