बीड (रिपोर्टर) : अखंड मराठा समाजासाठी लढा उभारणारे स्व. विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास समाधीस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे. तत्पूर्वी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या आज दुपारी एक वाजता मेटेंच्या समाधीस्थळी जात जयंतीनिमित्त अभिवादन केले. या वेळी खा. प्रितम मुंडे, आ. नमिता मुंदडा, रमेश आडसकर यांची उपस्थिती होती.
अखंड मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे, अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्ठा करणारे, आजच्या तरुण पिढीला व्यसनापासून दूर रहावे म्हणून बीडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयाजेन करणारे शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांचे गेल्या दहा महिन्यांपूर्वी दुर्दैवी अपघाती निधन झाले. आज स्व. मेटे यांचा जन्मदिन शिवसंग्राम आणि त्यांच्या समर्थकांकडून साजरा करत श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन आखण्यात आले आहे. समाधीस्थळी आज सकाळपासून हजारो समर्थकांनी स्व. मेटेंच्या समाधीचे दर्शन घेतले. ज्योतीताई मेटे यांनी शिवसंग्रामची धुरा हाती घेत शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना मोठा आधार दिला आहे. आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह
अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम होत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि स्व. मेटे यांचे अत्यंत जवळचे मित्रत्वाचे संबंध उभ्या महाराष्ट्राला आहेत. त्याअनुषंगाने फडणवीस आज काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज दुपारी स्व. मेटेंच्या समाधीस्थळी जात अभिवादन केले. मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांची भेट घेत काही काळ त्यांनी चर्चा केली.
0000