भुजबळ, दिलीप वळसे पाटील,
हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराम आतराम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी
घेतली मंत्रीपदाची शपथ
मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महाभूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपा-शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तडकाफडकी आज दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत अन्य नऊ आमदारांना शपथ देण्यात आली. राज्याच्या राजकारणातला वर्षभरातला हा दुसरा भूकंप आहे. शपथविधीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. राज्याच्या या विचित्र राजकारणामुळे राजकारणाची देशभरात चांगलीच चर्चा रंगू लागलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आणि खासदारांची अजित पवार यांनी बैठक बोलावल्यानंतर त्यांनी थेट विधानभवन गाठून शपथविधी घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार नाराज असल्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून सांगितले जात होते. अजितदादा भाजपासोबत जाणार, असेही बोलले जात होते. प्रदेश अध्यक्षपदावरून अजित पवार यांचे मतभेद होते, आज अजित पवार यांनी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या आमदार-खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर अजित पवार व त्यांचे समर्थक थेट राजभवनाकडे गेले आणि काही तासांमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीचे 30 आमदार असल्याचे सांगितले जाते. अजितदादा यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्माराव अतराम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्याला राज्यपाल बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. वर्षभरातला राज्याच्या राजकारणातला हा दुसरा महाभूकंप आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडे जलसंपदा खाते
बीडचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे राहणार
राज्याच्या राजकारणामध्ये आज प्रचंड घडामोडी झाल्या. अजित पवार यांच्या सोबत धनंजय मुंडे यांनी शपथ घेतली. धनंजय मुंडे यांच्याकडे जलसंपदा खाते येणार असल्याचे सांगितले जात असून बीडचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच येणार आहे. धनंजय मुंडे यांनी शपथविधी घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
दोन उपमुख्यंमत्री राहणार की
फडणवीस केंद्रात जाणार?
आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे गेले आहे. त्यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात दोन उपमुख्यमंत्री राहणार की, फडणवीस केंद्रात जाणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.