बीड (रिपोर्टर): अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बीडमधील परळीतून राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांचीही वर्णी कॅबिनेटमध्ये लागली. त्यामुळे गेली अनेक वर्ष विळा-भोपळ्याचं नातं असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाप्रकारे सत्तेतील वाटेकरु झाले. त्यानंतर दोघांमधील दुरावाही कमी होताना दिसत आहे. कारण पंकजांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडिओ खुद्द धनंजय मुंडेंनीच ट्विटरवर शेअर केला आहे.
राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे. असं लिहित वर्षानुवर्षांच्या वादावर मुंडे भावंडांनी पडदा टाकल्याचं चित्र आहे. दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास तयार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु चर्चेचे खंडनही केलेले नाही. त्यातच पंकजा आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेत असल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.