1 जुलै 2023 ची मतदार यादी ग्राह्य धरण्याचे आयोगाचे आदेश
बीड (रिपोर्टर): जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लवकरच घोषीत होणार असून राज्यातील जवळपास 2284 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. यात बीड जिल्ह्यातील 180 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसांी 1 जुलै 2023 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काल काढलेल्या परिपत्रकात जिल्हाधिकार्यांना दिलेले आहेत.
चुकीची प्रभाग रचना केल्यामुळे या निवडणुका रखडलेल्या होत्या. चुकीची प्रभाग रचना दुरुस्त झाल्याचे राज्य सरकारने आयोगाला कळविल्यामुळे आयोगाने हा कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यासोबतच काही ग्रामपंचायतींचे सरपंच हे काही कारणास्तव अपात्र झाले होते. काहींचा मृत्यू झालेला होता तर काही ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला होता. असे जवळपास राज्यातील 2284 ग्रामपंचायत असून त्यात बीड जिल्ह्यातील 180 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुका ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यासाठी दहा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आयोग या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषीत करू शकते. त्याअनुषंगाने 31 जुलै 2023 रोजी जिल्हा निवडणूक विभागाने प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. या प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर 31 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवयाच्या आहेत. तर अंतिम मतदार यादी ही 11 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा निवडणूक विभागाने प्रसिद्ध करावयाच्या आहेत. बीड जिल्ह्यातील 180 ग्रामपंचायतींमध्ये बीड 8, गेवराई 33, माजलगाव 42, परळी 3, अंबाजोगाई 4, धारूर 18, केज 24, वडवणी 8, पाटोदा 36, आष्टी 4, शिरूर कासार 20 अशा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सर्वात जास्त ग्रामपंचायती ह्या माजलगाव तालुक्यातील आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण ग्रामीण भागात तापणार आहे.