बीडमध्ये मेटे ताई, मस्के, नवले, खांडेंचीही गोची
माजलगावात प्रकाशदादांमुळे रमेश आडसकर अडचणीत
‘ते’ टोकाचे
‘मोका’ कोणाला?
बीड (रिपोर्टर): राज्यातल्या सत्ता संघर्षानंतर शिंदे-फडणवीस-पवार हे नवे सरकार काहीसे स्थिरावलेले असतानाच मतदार संघात मात्र इच्छुकांसह कार्यकर्त्यात अस्थिरता पसरल्याचे वातावरण दिसून येत आहे. तीन पक्ष एकत्रित आल्याने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही एकाला उमेदवारी द्यायची म्हटल्यानंतर अन्य दोघे त्याच्या पाठिशी उभे राहणार का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप तरी मिळत नसले तरी बीड जिल्ह्यातल्या चार मतदारसंघात गेल्या पंचवार्षिकमध्ये टोकाचे विरोधक असलेले आज सत्तेत मांडीला मांडी लावून बसल्याने विधानसभा लढवण्यासाठी कोणाला मोका मिळणार? यावर चर्चा होत असून जो तो सवत्यासुभ्याच्या तयारीला लागला आहे. परळीत धनंजय मुंडेंमुळे पंकजांची गोची, गेवराईत अमरसिंहांमुळे भाजपा आमदारावर टांगता तलवार तर माजलगावमध्ये रमेश आडसकरांच्या कार्यकर्त्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवार शिंदे-फडणवीसांच्या खेम्यात आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे होताना दिसून येत आहे. अगोदरच भाजपात तू तू मै मै असलेल्या पंकजा मुंडे या 2019 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अद्याप
स्थिरावलेल्या नाहीत. अशात धनंजय मुंडे हे सत्तेत सहभागी झाल्याने विधानसभा निवडणुकीत पंकजांना मतदारसंघ शोधावा लागणार आहे. थेट कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेणारे धनंजय मुंडे हे येणार्या विधानसभेचे उमेदवार असणार आहेत. इकडे गेवराईमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे आहेत. मात्र त्याठिकाणीही अमरसिंह हे सत्तेच्या काफिल्यात गेल्याने आणि दोघेही टोकाचे विरोधक असल्याने येणार्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी तिकिट कोणाला मिळणार? यावर चर्चा होत आहे. तशीच परिस्थिती माजलगाव मतदारसंघातही पहायला मिळतेय. इथे प्रकाश सोळंके हे विद्यमान आमदार आहेत मात्र ते सत्तेला मांडी लावून बसल्याने रमेश आडसकरांचे काय होणार? यापेक्षा बीड विधानसभा मतदारसंघात तर आधीच भाजपाने अनेकांच्या कोपरांना उमेदवारीचा गुळ लावला. इथे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांकडे आहेत परंतु पंकजा मुंडेंनी आधीच राजेंद्र मस्के यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे गटाकडून माजी मंत्री सुरेश नवले आणि शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव समोर येत आहे. शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे यांचेही पुनर्वसन देवेंद्र फडणवीसांना करावयाचे आहे. इथेही शिंदे-फडणवीसांना उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार आहे. इच्छुक भरमसाठ असल्याने आणि तिघे एकत्र झाल्याने फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांना उमेदवारी देताना मोठी डोकेदुखी तर होणार आहेच परंतु बीड जिल्ह्यात डावलाडावली झाली तर थेट बंडखोरी होण्याची दाट शक्णयता व्यक्त होत आहे. इथे केवळ आष्टी आणि केज मतदारसंघात तेवढी इच्छुकांची बहुगर्दी दिसत नाही, परंतु आष्टीत आधीच धस-धोंडे आणि आता विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हेही सत्तेशी जुळते घेत असल्याने अडचण निर्माण होईल.