बीड (रिपोर्टर): अंबाजोगाई तालुक्यातल्या पुसमध्ये गावठी कट्टा बाळगत अवैध धंदे करणार्यांची टीप गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट गावात धडक मारली असता संबंधित आरोपी पोलिसांना पाहताच पळू लागल्याने पोलिसांनी पाठलाग करत त्याच्या मुसक्या अवाळल्या. विश्वासात घेऊन पिस्टलबाबत विचारले असता त्याने घरामध्ये ठेवलेला गावठी कट्टा पोलिसांच्या स्वाधीन केला. घराची आणखी कसून तपासणी केली असता एक तलवार, चाकू सारखे घातक शस्त्र मिळून आले. त्याचबरोबर देशी-विदेशी दारू मिळून (पान 7 वर)
आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपीसह पोलिसांनी अन्य दोघांना जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक असे की, अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील बंडू ऊर्फ बंटी विश्वनाथ उदार हा व्यक्ती गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक साबळे यांना झाल्यानंतर त्यांनी फौजफाट्यासह आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुस गाठले. गावात पोलीस आल्याचे पाहून बंडु ऊर्फ बंटी पळू लागला. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करत त्याच्या मुसक्या बांधल्या. गावठी कट्ट्याबाबत विचारणा केली असता घरामधील कपाटात ठेवलेला गावठी कट्टा पोलिसांनी हस्तगत केला. तसेच घराची तपासणी केली असता घरामध्ये तलवार, चाकू, कत्ती सारखे धारदार शस्त्रे जप्त केले. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूही जप्त केली आहे. सदरची कारवाई ही पो.उपनि. खटावकर, सहाय्यक फौजदार जगताप, पो.कॉ. तांदळे, जायभाये, राठोड, हजारे, मुंडे, शेलार, पठाण यादव, चव्हाण, हराळे यांनी केली.