गणेश सावंत
मो. नं. 9422742810
जया शिरी कारभार। बुद्धी सार तयाची ॥
तुका म्हणे शूर राखे ।गांड्या वाखे सांगते ॥
राजकीय सौराचार्यांचा मंत्र
स्वत:स पोटास लावणे आहे
भुगोलाबरोबर इतिहास असलेल्या महाराष्ट्रात स्वातंत्र्य मिळवण्याची उर्मी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. इथल्या रयतेत निपचीत पडलेला स्वाभिमान अभिमानाच्या रुपात दिला. इथे स्वराज्य निर्माण केले. स्वातंत्र्याचा श्वास मिळवून दिला. अष्टप्रधान मंडळ दिले, स्वराज्य कसे चालवायचे आणि स्वराज्याचा मूळ उद्देश काय? हे सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वास पोटास लावणे आहे हा महाराष्ट्राला मूळमंत्र दिला. मात्र छत्रपतींच्या नावावर राजकारण करणार्या आजच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला काय दिले? छत्रपतींचा मूळमंत्र जपला काय, तर याचं उत्तर होय येईल. परंतु छत्रपतींनी सर्वास पोटास लावणे आहे’ हा मूळमंत्र दिला होता आणि आजच्या राज्यकर्त्यांनी, राजकारण्यांनी ‘स्वत:हास पोटास लावणे आहे’, ‘स्वत:चे पोट भरणे आहे’ हा मूळमंत्र स्वीकारला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांच्या कालखंडात सर्रास राजकीय सौराचार सुरू ठेवला. निवडणुकांमध्ये एकमेकांचे वाभाडे काढायचे आणि निवडणुका झाल्यानंतर सत्ताकारणाचे गणित जुळत नसल्याने एकमेकांच्या शेज सजवायच्या अन् सत्तेच्या ललणेसोबत निजायचे एवढेच धोरण भाजपाने महाराष्ट्रात आखले. दिल्लीच्या ‘शाह्यां’ंच्या उंगलीयाची डोर नव्हे तर कठपुतली होण्याची धन्यता स्वत:ला शिवबांचे मावळे समजणारे जेव्हा मानतात तेव्हा आजच्या स्वराज्यात बाजी, तानाजी, मदारी नव्हे तर रांझेगावच्या पाटलापासून सर्वच इथे खंडोजी झालेत. असाच अनुभव पहावयास मिळत आहे. महाराष्ट्राचं राजकारण आणि
राजकीय सौराचार
इतका बोकाळला आहे, कोण कोणासोबत, केव्हा-कुठे राजकीय शय्यासोबत करेल आणि भाद्रपदाचा महिना आणेल हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाचे कारण पुढे करत जो तो अभद्र गळाभेट घेऊन सत्तेच्या ललणेच्या कमरेत हात घालून मिरवत आहे. हे मिरवताना सत्ताकारणाचे गणित जुळवताना जो आनंद होतो त्याचे पडसाद रयतेच्या मुखावर कधी कोणी पाहण्याचे धाडस केले का? जे देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीला अछूत मानायचे, अस्पृश्यतेत गिणायचे त्याच देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी आज मायेचा आधार वाटतोय, ज्या अजितदादांना भ्रष्टाचारी संबोधायचे, त्यांची जागा जेलमध्ये आहे, हे विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर सांगायचे, त्याच अजितदादांना आज फडणवीसांनी सोबत घेतले. राष्ट्रवादीशी भविष्यात आज-उद्या आणि काल युती करणार नाही, ती तात्विक नसेल, अन्य कुठल्याही पद्धतीची नसेल हे देवेंद्र फडणवीस मुलाखतीमधून सांगायचे. मात्र आज त्याच राष्ट्रवादीसोबत फडणवीसांनी गळाभेट घेतली. वैचारिक विरोध आणि कर्मठ विरोधी पक्ष हा सत्ताकारणाचा पाय कधीच घसरू देत नाही, मात्र इथं ज्या पद्धतीने राजकारण, अर्थकारण आणि सामाजिक धोरणाकडे पाहितलं जातं, तिथं हे राजकारण केवळ स्वत: पुरतं आहे, हे स्पष्ट होते.
जया शिरी कारभार। बुद्धी सार तयाची ॥
वरते तैसे वरते जन। बहुता गुण एकाचा॥
आपनिया पाक करी । तो इतरी सेवेजे ॥
तुका म्हणे शूर राखे ।गांड्या वाखे सांगते ॥
जगद्गुरू तुकोबा या अभंगातून सांगतात, ज्याच्या डोक्यावर कारभाराची जबाबदारी असते, जो कारभारी असतो त्याची बुद्धी सत्य असावी लागते, चांगली असावी लागते, कारण हा कारभारी जसा वर्तन करतो तसेच इतर लोकही वर्तन करत असतात. स्वयंपाक जरी एक स्वयंपाकी करत असला खाणारे जास्त असतात. स्वयंपाकाला चव असावी लागते. एकूणच आपण जर शुरासोबत राहिलो तर शुरासारखे वर्तन करतो. नाहीतर एखाद्या गांडु व्यक्तीची संगत धरली तर दु:ख पिडाच किवा उपद्रवच सहन करावा लागतो. आज तोच उपद्रव, पिडा आणि दु:ख महाराष्ट्राच्या रयतेला कर्तव्यशून्य, स्वार्थी राजकारण्यांमुळे सहन करावे लागत आहे. आम्हाला आश्चर्य याचे वाटते, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या फुटीर गटाच्या
वैयक्तिक भांडणाचा
महाराष्ट्राशी संबंध काय?
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत फुट पडली. एकनाथ शिंदे हे चाळीस-बेचाळीस आमदारांसह भाजपाशी मिळाले. कारण काय तर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना ठेवली नाही, त्यांनी हिंदुत्व सोडलं, ते राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले, शरद पवारांशी जवळीक केली, असे एक ना अनेक कारण सांगत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेला ढेर केले. पुढे शिंदे गटाने असेही म्हटले, राष्ट्रवादी सोबत गेलो म्हणून आमचे वाटोळे झाले, राष्ट्रवादीचे अजित पवार हे आमच्या आमदारांना निधी देत नाहीत, शिवसेना संपवण्याचा त्यांचा इरादा आहे. शिंदेंच्या या ‘स्वाभिमानी’ आरोपाला महाराष्ट्रातील जनतेने मान्यताही दिली असती परंतु आज त्याच मुख्यमंत्री शिंदेंच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे अर्थखातं देण्यात आलं आहे. मग आता शिंदे महाराष्ट्राला काय सांगणार? शिंदेंचे आमदार महाराष्ट्राच्या जनतेसमोर कुठले तोंड घेऊन जाणार? एवढ्या एका पॅराग्रॉफमधून शिंदे गटाला महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं देणेघेणं नाही, हे स्पष्ट होते. राहिला प्रश्न राष्ट्रवादीच्या फुटीरतेचा, जी भाजप राष्ट्रवादीला पाण्यात पहात होती, जी भाजप अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देत होती, जे भाजपाचे नेते अजित पवारांची तळ्यात मुतण्यापासून उठण्यापर्यंत खिल्ली उडवत होते तेच अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते थेट भाजपाच्या खेम्यात गेले. मग फुटीर राष्ट्रवादी आणि शिवसेना गट हा महाराष्ट्रासाठी गेला की, वैयक्तिक स्वार्थासाठी? स्वरक्षणासाठी गेला हे समजायला महाराष्ट्रातील जनता एवढी दुधखुळी नाही. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे जयघोष करायचे अन् त्यांच्याच स्वराज्याच्या नावे सौराचाराचे राजकारण चालवायचे, त्याच महाराष्ट्रात विठ्ठलाचे नाम:स्मरण होत असताना
राजकारण्यांचे
विठ्ठल किती?
हा आम्हाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकागरण, अर्थकारण, शैक्षणिक धोरण अथवा कुठलंही क्षेत्र हे छत्रपतींच्या मावळ्याशिवाय आणि तुकोबांच्या भक्तीशिवाय अधुरं असतं. त्याच शिवबा-तुकोबांच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला पंढरीचा विठठल ठाऊक आहे. मात्र फुटीरवादी राजकारण्यांच्या तोंडून विठ्ठल निनाद जेव्हा ऐकतो, तेव्हा मातोश्री ते बारामती विठ्ठल आम्हाला पहायला मिळतात. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या बाजुला बडवे आहेत, विठ्ठल चांगला आहे, म्हटले. त्यापूर्वी छगन भुजबळांनी शिवसेना सोडली, तेव्हाही भुजबळांनी ‘माझा विठ्ठल चांगला, म्हणजेच शिवसेनाप्रमुख चांगले, तेच माझे विठ्ठल’ असे सातत्याने म्हटले. पुढे ते राष्ट्रवादीत आले आणि आता राष्ट्रवादी फोडून ते भाजपाच्या खेम्यात गेले, इथंही छगन भुजबळांनी ‘माझे विठ्ठल शरद पवार चांगले, बडवे बेक्कार’ असाच सूर लावला. मग विठ्ठल तरी किती? आम्हाला खरं तर या ठिकाणी राजकीय फुटीरवाद्यांच्या विठ्ठल नाम:स्मरणात कवी सुरेश भटांच्या या चार ओळी आठवतात… सुरेश भट म्हणतात…
ताठ कलरींचा ताठा वाकणार आहे!
वंचनाच ज्याची त्याला गाडणार आहे!
गटारात खुपसून माना सूर्य शोधती जे
गगन का तयांचे मिंधे राहणार आहे?
मठोमठी मंबाजींना कीर्तन करू द्या
विठू काय बेमानांना पावणार आहे?
या सहा ओळी वाचून नक्कीच वाचकांच्या तोंडावर हसू फुटले असेल. अंत:करणाला भिडणार्या आणि आजच्या राजकारण्याचंी वस्तूस्थिती सांगणार्या या ओळींमध्ये मंबाजीच्या किर्तनाला सोळाव्या शतकामध्ये जसे महत्व नव्हते, तसे आजच्या फुटीरवादी, अनैसर्गिक, सौराचार्य राजकारण आणि सत्ताकेंद्रांना महत्व नाही विठ्ठल त्यांना पावणार नाही. असे जर महाराष्ट्रातील उभ्या रयतेचे मत असेल, तर ते खर्या स्वाभिमानी महाराष्ट्राचे धोरण मानता येईल. गेल्या चार वर्षांच्या कालखंडामध्ये जो राजकीय सौराचार झाला अथवा या सौराचारातून महाराष्ट्राला काय विचार मिळाला?
महाराष्ट्राचे प्रश्न
‘जैसे थे’ असताना केवळ स्वहेतूसाठी काकावलयंकीत राहत कलंकीत ते कुटनिती एवढेच प्रश्न महाराष्ट्राचे आहेत का? दिल्लीच्या शाह्यांनी महाराष्ट्राच्या पक्षांत फुटरतेचे बीज रोवायचे, आपल्या सर्व शक्त्या या नेत्यांच्या पाठीशी लावून त्यांना गप्प बसायचे, पक्ष फोडायचे, एवढेच धोरण जर दिल्लीश्वर असलेल्या शहा-मोदींचे असेल आणि या धोरणाला महाराष्ट्रातले विविध पक्षांचे फुटीरवादी तोरण मानत असतील तर हा त्यांचा स्वत:चा फायदा म्हणावा लागेल. परंतु महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी दिल्लीश्वरांपासून ते फुटीरवाद्यांपर्यंत त्यांनी नेमके काय प्रयत्न केले? अथवा शिवसेना आणि राष्ट्रावादीमध्ये झालेल्या अंतर्गत भांडणाचा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेशी संबंध काय? हे प्रश्न आता महाराष्ट्राचे प्रश्न म्हणून समोर येणार. तेव्हा कोणी कितीही विठ्ठलाचा धावा केला तरी विठ्ठल हा ‘सत्य -असत्याशी मन केलीय ग्वाही, मानलिये नाही बहुमता’ हे धोरण आखणार्या तुकोबांच्या भक्ताच्या पाठीशी राहील. स्वराज्याचे पाईक म्हणून ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हे धोरण आखणार्या नेतृत्वासोबत जाईल.