बीड (रिपोर्टर): विद्युत शॉक लागून एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा कासरा हातात असलेला शेतकरी बालंबाल बचावला. ही घटना काल सायंकाळी टाकरगव्हाण (ता. गेवराई) येथे घडली. या प्रकरणी पशूवैद्यकीय अधिकारी मात्र पंचनामा करण्यासाठी सुट्टीचे कारण देत आले नसल्याचे शेतकर्याने सांगितले.
श्रीराम सखाराम गव्हाणे (रा. टाकरगव्हाण ता. गेवराई) या शेतकर्याने गेल्या आठ दिवसांपूर्वीच नव्वद हजाराची बैलजोडी खरेदी केली होती. शेतात पाळीचे काम सुरू होते. पाळी झाल्यानंतर काल सायंकाळी ते घरी आले. घराशेजारी कोठ्यात बैलजोडी घेऊन जात असताना जवळच असलेल्या विद्युत पोलचा पावसामुळे एका बैलाला शॉक लागला. तो जमीनीवर कोसळला. या वेळी शेतकरी श्रीराम गव्हाणे यांनी त्याचा कासरा पकडलेला होता. त्यांच्याही हाताला मुंग्या आल्या. त्यांनी तात्काळ कासरा सोडल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी त्यांनी कालच पशुवैद्यकीय अधिकार्यांना घटनेची माहिती दिली, मात्र काल ते आले नाही. आजही सुट्टीचे कारण देत उद्या येऊ, असे म्हणत येणे टाळले. महावितरणच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिल्याचे समजते.