आष्टी न.पं.च्या अध्यक्षपदी आयशा बेग तर पाटोद्याच्या नं.प.च्या अध्यक्षपदी
दिपाली जाधव
आष्टी/पाटोदा (रिपोर्टर): आष्टी, पाटोदा नगरपंचायत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एक-एकच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अखेर या दोन्ही ठिकाणी अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली. पाटोदा येथे अध्यक्ष म्हणून दिपाली राजू जाधव तर आष्टी येथे जिया बेग यांच्या मातोश्री आयशा बेग या बिनविरोध निवडून आल्या. या निवडीनंतर दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
आष्टी आणि पाटोदा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे राजीनामे गेल्या आठवडाभरापूर्वी देण्यात आले होते. विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात या दोन्ही नगरपंचायती असून धस यांच्याकडून कार्यकर्त्यांना समान वागणूक आणि अधिकार दिले जात असल्याचे प्रत्यय पुन्हा एकदा या निवडीवरून दिसून आले. दोन्ही ठिकाणी मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व करण्याचा मोका धसांकडून देण्यात आला. या वेळेस आष्टी नगरपंचायतीमध्ये मुस्लिम समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली गेली. आष्टी येथील जिया बेग यांच्या मातोश्री आयशा बेग यांनी अध्यक्षपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रतिस्पर्ध्यांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने आयशा बेग या बिनविरोध निवडल्या तर पाटोद्यातही दिपाली राजू जाधव यांचा एकमेव अर्ज अध्यक्षपदासाठी आला होता. या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांकडून अर्ज न आल्याने दिपाली जाधव या बिनविरोध निवडल्या गेल्या. या निवडीनंतर आष्टी आणि पाटोद्यात जल्लोष साजरा करण्यात आला.