बीड (रिपोर्टर): बीड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक हे गेल्या कित्येक वर्षांपासून गुडघे इतके खड्डे, चिखल आणि घाणीच्या साम्राज्यात सापडलेले आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात बसस्थानकातून प्रवाशांना प्रवास करणे अतिशय कष्टप्रद होत आहे. याबाबत बीडच्या लोकप्रतिनिधींना विसर पडलेला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणारे प्रवासी आणि वाहनचालक, वाहक प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करत आहेत.
प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये बीड बसस्थानकात गुडघे इतके खड्डे पडलेले असतो यामुळे चिखल, घाण प्रचंड प्रमाणात होत आहे. पावसाळा संपल्यानंतर बसस्थानक प्रशासनाकडून मुरुम टाकला जातो. जेणेकरून पावसाळ्यात तुम्ही हा त्रास सहन करत असा अप्रत्यक्ष संदेश बसस्थानक प्रशासन आणि बांधकाम विभाग प्रवाशांना देत असते. गेल्या दहा वर्षांपासून बसस्थानकाची निविदा निघालेली आहे, त्यानंतर बेसमेंट करण्याच्या कामाला तीन वर्षापूर्वी प्रारंभही करण्यात आला, पण बेसमेंटचे बंद पडलेले काम गेल्या तीन-चार वर्षात पुढे का सरकत नाही याचा ताळमेळ लोकप्रतिनिधी, बांधकाम विभाग आणि बसस्थानक प्रशासनाला लागत नाही. बीडच्या विकासाच्या बाबत अनेक वल्गना करण्यात येतात. मात्र बसस्थानक बांधकामाकडे कोणीच लक्ष देत नाही, पावसाळ्यात तर प्रत्येक प्रवासी लोकप्रतिनिधी आणि बसस्थानक प्रशासनाबाबत अक्षरश: शिव्या देऊन संताप व्यक्त करत अहेत.
बसस्थानकात असुविधा, बसांचे नियोजनही कोलमळलेले
बसस्थानकात प्रवाशांसाठी कुठल्याच सुविधा नाहीत, त्यातही प्रत्येक बस आपल्या आपल्या प्लॅटपॉर्मवर थांबत नाही. महत्वाच्या अशा बीड-परळी मार्गावरच्या बसेस कधीच वेळेवर सुटत नाहीत. प्रत्येक बस ही एक-एक तासाच्या अंतराने सुटते. माजलगाव, परभणी, नांदेड, परळी या मार्गावर प्रवास करणारे असंख्य कर्मचारी आहेत, त्यांच्या वेळा चुकतात तर काही बस या चक्क रस्त्यावर लावल्या जातात त्यामुळे किमान वेळेवर बस सोडण्याचे तरी बसस्थानक प्रशासनाने मनावर घ्यावे, अशी अपेक्षा प्रवाशातून व्यक्त होत आहे.