बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा रुग्णालयातील आरोग्य भरती प्रक्रिया सर्रासपणे पैशे घेून होत असल्याची ओरड सर्वत्र होत असताना आज सदरचा प्रश्न विधान परिषदेमध्ये गाजला. आ. पडळकरांनी बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठिशी का घालता, असा सवाल करताच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तत्काळ डॉ. सुरेश साबळे यांना निलंबीत केल्याची घोषणा करून पुढील चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले.
विधान परिषदेमध्ये आज आ. पडळकर यांनी बीड जिल्हा रुग्णालयातील भरती प्रकरणी प्रश्न उभा केला. सदरच्या भरती प्रकरणातील भ्रष्टाचारा प्रकरणी सातत्याने वर्तमानपत्रातून बातम्या येतात. भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात येते. तरीही जिचल्हा शल्यचिकित्सकांना पाठिशी का घालण्यात येते? असा सवाल उपस्थित केला. यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना संबंधित डॉक्टरबाबत आधीच दोन चौकश्या सुरू आहेत. त्यानंतर ही तिसरी तक्रार आहे, सभागृह सदस्यांच्या भावना लक्षात घेता साबळे यांना तत्काळ सस्पेंड करतो, पुढे कायदेशीर चौकशी जी व्हायची ती होईल, असे म्हटले.
डॉ. साबळे रुग्णांसाठी चांगले
जिल्हा रुग्णालयात डॉ. साबळे हे आल्यापासून रुग्णालय हे सुतासारखे सरळ झाले आहे. स्वच्छता, कर्मचार्यांची काम करण्यामध्ये तत्परता, वेळेवर डॉक्टरांची उपस्थिती आणि गरजू रुग्णांना रुग्णसेवा ही डॉ. साबळे यांच्या कार्यकाळामध्ये तत्काळपणे मिळत आहे. त्यामुळे डॉ. साबळे हे रुग्णांसाठी चांगले आहेत. अशा स्पष्ट प्रतिक्रिया बीड शहरातून व्यक्त होत होत्या.