गेवराई तालुक्यातील राहेरी येथील घटना
गेवराई, (रिपोर्टर) तालुक्यातील राहेरी येथे कन्हैया अनिल फलके वय वर्ष 5 हा आपल्या आजोबा आजी सोबत शेतामध्ये गेला होता. सकाळपासून शेतामधे आजी, आजोबा काम करत होते. यावेळी कन्हैया एकटाच चेंडू खेळत होता. बाजूलाच राहेरी येथील जलजीवन मिशनच्या विहिरीचे काम चालू होते. भली मोठी विहीर खोदून ठेवण्यात आली होती. या विहिरीला कुठलीही संरक्षण जाळी बसवलेली नव्हती. कन्हैया चेंडू खेळत असताना त्याचा चेंडू विहिरीच्या दिशेने गेला. यावेळी त्याचा विहिरीमध्ये तोल गेल्याने विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. गुत्तेदाराच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाला असून सदर गुत्तेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
गेवराई तालुक्यातील राहेरी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत शेतामध्ये विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे काम अपूर्ण आहे. या विहिरीच्या बाजूला फलके यांचे शेत आहे. नेहमीप्रमाणे फलके कुटुंबीय आपल्या शेतामध्ये सरकी खुरपण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा लहान चिमुकला कन्हैया हा आपल्या आजी आजोबा सोबत शेतामध्ये गेला होता. आजोबा झाडाखाली आराम करत असताना आजी व त्याची आई शेतामध्ये सारकी खुरपत होत्या यावेळी कन्हैया आपल्या आजोबा शेजारी झाडाखाली चेंडू खेळत होता खेळता खेळता चेंडू बाजूला असलेल्या विहिरीजवळ गेला, त्याचा चेंडू विहिरीमध्ये पडला तोच चेंडू पाहण्यासाठी गेला असता त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला व त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.
दुपारच्या सुमारास कन्हैया ची आई, आजी, आजोबा जेवण करण्यासाठी कन्हैयाला आवाज देऊ लागले परंतु कन्हैया काही दिसेनासा झाला सर्व शेतामध्ये पाहिले परंतु तो काही सापडेना गेला. यावेळी विहिरीकडे पाहीले असता तो ज्या चेंडू सोबत खेळत होता तो चेंडू विहिरीमध्ये आढळून आला. यानंतर त्यांना संशय आल्यानंतर दुपार पासून त्याचा विहिरीमध्ये शोध घेणे चालू होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला. संबंधित गुत्तेदाराने जर विहिरीला संरक्षण जाळी बसवली असती तर या निष्पाप बालकाचा बळी गेला नसता. त्या गुत्तेदारा विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. घटनेची माहिती मिळताच तलावाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे दाखल केला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.