बीड (रिपोर्टर): बीडशहरातील जालना रोडवर असलेल्या साई विठ्ठल प्रतिष्ठाणच्या समोर मोकळ्या जागेत एका प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये सहा ते सात महिन्याचे पुरुष जातीचे अर्भक आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. महिलेचा गर्भपात हा घरी किंवा अवैधरित्या झाला असल्याचा अंदाज बांधण्यात येत असून त्या दिशेने पोलीस तपास करत अहेत. जालना रोडसह परिसरातील सीसीटीव्ही तपासणे दुपारपर्यंत सुरू होते. इतर ठिकाणचेही काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठाणच्या समोरील मोकळ्या पटांगणात एका प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये अर्भक असल्याची माहिती गाडीला ग्रीस लावण्यासाठी आलेल्या वाहकाला दिसले. त्याने जागा मालकाला याची कल्पना दिली. जागा मालकाने याची माहिती पोलिसांना देताच घटनास्थळी ठाणेप्रमुख मुकुंद कुलकर्णी, अशफाक सय्यद, मनोज परझने, एएसआय सिरसट यांच्यासह शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये कापडाने गुंडाळून ठेवलेलं पुरुष जातीचं सहा ते सात महिन्यांचा अर्भक आढळून आला. पोलिसांनी ते ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात आणला. डॉक्टरांनी तपासून ते पुरुष जातीचा असल्याचे सांगितले. हे अर्भक कोणी फेकले? हे मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी जालना रोडसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले मात्र दुपारपर्यंत आरोपी निष्पन्न झाले नाहीत. हा गर्भपात घरीच किंवा अवैध ठिकाणी करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.