कलेक्टर कचेरीसमोर एक तासाचा रास्ता रोको; वाहतूक ठप्प
आंदोलकांचे ठिय्या आंदोलन; रुग्णालय कर्मचार्यांचेही निषेध निदर्शने
बीड (रिपोर्टर): वैयक्तिक द्वेषातून राजकीय हस्तक्षेप करत बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तडकाफडकी निलंबन केल्यानंतर याचे तीव्र पडसाद कालपासून बीड जिल्ह्यात उमटताना दिसून येत आहेत. आज बीड शहरातल्या विविध पक्ष-संघटना यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून डॉ. साबळेंच्या निलंबनाचा तीव्र विरोध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोखून धरत एक तास वाहतूक ठप्प केली. सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून डॉ. साबळेंचे निलंबन परत घ्या, म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले. डॉ. साबळे यांचा आणि भरती प्रक्रियेचा कुठलाच संबंध नाही. भरती करणारे राजकीय मग साबळेंचा बळी का? असा सवाल उपस्थितांनी विचारला. संतप्त सर्वसामान्यांनी या प्रकरणाचे निवेदन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना दिले.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी वैयक्तिक द्वेषातून राजकीय हस्तक्षेप करत बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचा बळी घेतला. सावे यांनी साबळे यांची बदली केल्या बाबत अनेक चर्चा होत असून प्रामुख्याने टक्केवारीचा विषय समोर येत आहे. त्यातूनच साबळे यांचा बळी गेल्याचे बोलले जाते. भरती प्रकरणी काल विधान परिषदेमध्ये आ. पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बीडचे जिचल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या निर्णयाचा सर्वस्तरातून निषेध होऊ लागला. डॉ. साबळे यांचे कार्य चांगले असून ते जिल्हा रुग्णालयात आल्यापासून रुग्रालयामध्ये अनेक सुविधा निर्माण झाल्या. रुग्णांना वेळेवर सुविधा मिळू लागल्या. त्यांच्यावर झालेली कारवाई ही अन्यायकारक असून त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज विविध पक्ष संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी उद्धव ठाकरे गटाचे अनिल जगताप, आमद आदमी पार्टीचे येडे, डॉ. गणेश ढवळे, अमर नाईकवाडे, अशोक तावरे, डॉ. योगेश क्षीरसागर, कुंदाताई काळे, शिवराज बांगर, स्वप्नील गलधर, संगमेश्वर आंधळकर, के.के. वडमारे, उबाळे, गोपाळ धांडे, शैलेश जाधव, व्यापारी महासंघाचे सोहनी यांच्यासह आदी कार्यकर्ते, नागरीक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी शासनाच्या निषेधार्थ प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली तसेच जिल्हा रुग्णालयासमोर कास्ट्राईब संघटनेचे एस.टी. गायकवाड यांनीही आंदोलन केले. शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून शासनाने आपला निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनावेळी जिल्हा रुग्णालयाचे कर्मचार्यांसह रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अॅम्ब्युलन्स चालकांची रॅली
डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज सर्वत्र आंदोलन होत आहे. या आंदोलनामध्ये जिल्हा रुग्णालयातील अॅम्ब्युलन्स चालकांनी सहभाग घेतला. जिल्हा रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. यात खासगी अॅम्ब्युलन्स चालकांचा सहभाग होता.