विरोधी पक्षनेते दानवे, मंत्री भुमरे एकमेकांच्या अंगावर धावले
औरंगाबाद (रिपोर्टर): औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आज प्रचंड राडा झाल्याचे दिसून आले. ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचे सांगितले तेव्हा मुख्यमंत्री शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी उदयसिंह राजपूत यांना एकेरी भाषेत बोलायला सुरुवात केली तेव्हा चांगलाच वाद वाढला. या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे राजपूत यांच्या मदतीला धावून गेले आणि भुमरे, सत्तार यांना सुनावले. त्यावेळी हमरातुमरी होत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद झाला.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सकाळी सुरू झाली. बैठकीला मंत्री संदीपान भुमरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अब्दुल सत्तार, आ. उदयसिंह राजपूत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठक सुरू झाल्यानंतर उदयसिंह राजपूत यांनी आपण वेळोवेळी निधीची मागणी केल्यानंतरही निधीही मिलत नसल्याचे म्हटले. यावर ठाकरे गटाच्या आ. राजपूत यांना शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी एकेरी भाषेत बोलायला सुरुवात केली. त्यामुळे ठाकरे-शिंदे गट या ठिकाणी चांगलेच भिडले. सदरची परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे आमदार राजपूत यांच्या मदतीला धावले. ज्या भाषेमध्ये मंत्री महोदय आणि माजी मंत्री बोलत आहेत ती भाषा योग्य नसल्याचे सांगत दानवेंनी भुमरे, सत्तार यांना सुनवायला सुरुवात केली. या वेळी या दोघांमध्ये हमरातुमरी आणि वाद सुरू झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, भुमरे आणि दानवे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. जिल्हा नियोजन समितीची बैठक चांगलची वादळी ठरत असून दुपारी एकच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला.