बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्याबद्दल उगीचच बाहेर काहीतरी बोललं जातं, मात्र प्रत्यक्षात बीड जिल्ह्यात आल्यानंतर येथील माणसं खूप लळा लावणारे आहेत, मनाने मोकळे आहेत, प्रेमळ आहेत, जिल्ह्यात काम करण्यासही खूप मोठा वाव आहे, असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले.
दोन वर्षांपूर्वी बीड जिल्हा परिषदेला अजित पवार हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आले होते. त्यांची नुकतीच राज्य सरकारने बदली केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचार्यांच्या वतीने त्यांना सदिच्छा निरोप समारंभ देण्यात आला. त्याप्रसंगी पवार बोलत होते. पवार पुढे बोलताना म्हणाले की, बीड जिल्ह्याबद्दल बाहेर चांगली चर्चा करत नाहीत. मात्र येथे आल्यानंतर या चर्चेला काहीच अर्थ उरत नाही. इथली माणसे ही मोकळ्या स्वभावाची आहेत, त्यांना अगोदर समजून घेतले पाहिजे, मग काम करण्यास स्कोप मिळतो. त्या कामाला जिल्ह्यातील पदाधिकारी, नागरीकही सकारात्मक प्रतिसाद देतात. शासनाच्या अनेक चांगल्या योजना आहेत, त्या इथे चांगल्या पद्धतीने राबविल्या तर जिल्ह्याचा आर्थिक आणि सामाजिक चांगला विकास होईल. दोन वर्षापूर्वी बदली झाल्यानंतर सर्व खातेप्रमुखांना आणि कर्मचार्यांना विश्वासात घेऊन काम केले त्यामुळे चांगले काम करता आले. या वेळी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचार्यांच्या वतीने भेटवस्तू देऊन अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक खातेप्रमुखांनी पवारांविषयी आपले आलेले अनुभव आणि विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी काकडे, केकान, शिक्षणाधिकारी कुलकर्णी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी शिंदे, वित्त व लेखाधिकारी केंद्रे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.