‘शिवछत्र’ला शह देण्यासाठी शरद पवारांनी गाठला बदामरावांचा बंगला
बीडमध्ये डेरेदाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पवारांचे
जल्लोषात स्वागत
जितेंद्र आव्हाड, रोहीत पवार, अनिल देशमुख, राजेश टोपे व्यासपीठावर
बीड (रिपोर्टर): मुंडेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या बीड जिल्ह्यात थोरल्या पवारांचा काफिला डेरेदाखल झाला. पवारांच्या स्वागतासाठी शहागडपासून ते थेट बीडपर्यंत समर्थकांनी प्रचंड उत्साह दाखवला. ज्या पवारांना बीडमधून सातत्याने पाठिंबा मिळतो त्या पवारांच्या पाठिशी अवघा एक आमदार बीडमध्ये उरल्याने शरद पवारांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिली सभा बीडमध्ये लावली. आज येतानाच गेवराईत बदामराव पंडितांच्या निवासस्थानी जावून शरद पवारांनी अमरसिंहांना शह देण्याचे संकेत दिले. तर पुढे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शरद पवार बीड शहरात डेरेदाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आ. संदीप क्षीरसागर समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांना क्रेनने हार घातला. पुढे ते सभास्थळी गेले. शरद पवार मुंडेंच्या बालेकिल्ल्याला आपल्या शब्दांच्या गोळ्यातून किती हादरे देतात अन् मुंडेंचे किती शिलेदार आपल्या काफिल्यात वळविण्यात यशस्वी होतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी प्रथमच महाराष्ट्र दौर्याला सुरुवात केली. पहिली सभा ही कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात लावून महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडेंचे नेतृत्व अनन्यसाधारण असल्याचे पवारांनीच दाखवून दिल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राला पहायला मिळाले. शरद पवार हे बीडच्या सभेत काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असतानाच आपला काफिला घेऊन पवार बीड जिल्ह्याच्या सीमेवर येताच तिथपासून पवार समर्थकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अमरसिंह पंडित हे अजित पवार यांच्या सोबत गेल्याने शरद पवारांनी त्यांना शह देण्याहेतू गेवराईत थेट माजी मंत्री बदामराव पंडितांचा बंगला गाठला. त्याठिकाणी बदामरावांनीही मोठे शक्तीप्रदर्शन करून पवारांच्या हाकेला साद दिली. बदामराव पंडित आणि शरद पवार यांच्यात काही काळ गुफ्तगू झाली. स्वागत, सत्कार झाल्यानंतर पवारांचा काफिला बीडच्या दिशेने धावला. रस्त्यात एकदोन ठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. बीड शहरात डेरेदाखल झाल्यानंतर आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर त्यांचे जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, प्रचंड घोषणाबाजी, ‘पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ची गगनभेदी घोषणा लक्षवेधक ठरली. या ठिकाणी क्रेनने शरद पवार यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे पवार हे सभास्थळी पोहचले. दुपारी बाराची सभा दोन वाजेपर्यंतही सुरू झाली नसल्याने पवार काय बोलले हे इथे देता आले नाही.