सीईओंना अंधारात ठेवत कुलकर्णी यांनी या प्रतिनियुक्त्या केल्या
बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषद किंवा महसूल विभागाने कोणत्याही अधिकारी, कर्मचार्याची प्रतिनियुक्ती करू नये, असे राज्य सरकारचे आदेश आहेत. असे असतानाही शिक्षण विभागाने दोन शिक्षण विस्तार अधिकार्यांच्या प्रतिनियुक्त्या केलेल्या आहेत. विशेषत: या ठिकाणी कर्मचारी असताना पाटोदा पंचायत समितीतील पंचायत विभागाचा कारभार पाहणारे विस्तार अधिकारी शेळके यांच्याकडे चक्क समग्र शिक्षण अभियानातील कार्यक्रम अधिकारी या पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी सोडून चक्क शेळके यांच्याकडे पदभार सोपवण्याकडे कोणाचा इंट्रेस्ट होता आणि झारीतील शुक्राचार्य कोण? याबाबतची चर्चा कालपासून जिल्हा परिषद शिक्षण विभागात आहे.
शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी तुकाराम पवार यांच्याकडे कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षण अभियान या पदाचा अतिरिक्त पदभार होता. दोन्ही पदे ही समकक्ष आणि बीड मुख्यालयी असल्याने हा पदभार रितसर होता. ामत्र त्यांच्याकडील कामाचा व्याप जास्त असल्याचे तुटपुंजे कारण देत शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी पाटोदा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी ऋषिकेश शेळके यांच्याकडे समग्र शिक्षण अभियानातील कार्यक्रम अधिकारी पदाचा पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अंधारात ठेवत दिला. तर दुसरे विस्तार अधिकारी राठोड यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी गेवराई येथील विस्तार अधिकारी पदाचा पदभार दिला आहे. शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी कोणाच्या दबावाला बळी पडत, कोणाच्या इंट्रेस्टसाठी या दोन अधिकार्यांना आयुक्तांच्या परवानगीविना प्रतिनियुक्त्या दिल्या आहेत? याची चर्चा मात्र शिक्षण विभागात होत आहे.