शिरूर कासार (रिपोर्टर): ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा एक थेंबही पडला नसून शिरूर तालुक्यातील खरीप पिके वायाला गेले. शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, या सह इतर मागण्यांसाठी आज तहसील कार्यालयावर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. मोर्चामध्ये शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व शेतकर्यांची उपस्थिती होती.
यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडला. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. ऑगस्ट महिना पुर्णपणे कोरडा गेल्याने कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी या पिकांची वाढ खुंटली. शिरूर तालुक्यातील परिस्थिती अत्यंत भयानक असून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, शासनाच्या वतीने विमा कंपनीमार्फत देण्यात येणारी अग्रीम रक्कम शिरूर तालुक्यातील सर्व मंडळांना सरसकट अग्रीम रक्कम देण्यात यावी, शंभर टक्के विमा लागू करण्यात यावा, शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, रोहयाचे कामे सुरू करावे, विजेचे बील माफ करावेयासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. हा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. सदरील मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिजामाता चौक मार्गे तहसीलवर धडकला.
या वेळी दादासाहेब चाचतोडे, रमेश सानप, हरीभाऊ सावंत, शेख आसिफ, महादेव सावंत, ठकसेन तुपे, अंबादास गोरे, अशोक बहिरवाळ, रामेश्वर शेळके, संभाजी जाधव, अशोक केकान, अशोक केदार, अतुल खेंगरे, ज्ञानेश्वर ढवळे, मिनाताई जायभाये यांच्यासह आदींची उपस्थिती होती.