नेकनूर (रिपोर्टर): मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करत लेखी स्वरुपात पाठिंबा देण्यात यावा, या मागणीसाठी बालाघाट परिसरातील 11 गावच्या मराठा समाजाच्या तरुणांनी आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करत ‘एक मराठा लाख मराठा’ची घोषणा दिली. ‘एकच मिशन मराठा आरक्षण’च्या घोषणेने आ. मुंदडांचं निवासस्थान दणाणून गेलं.
दोन दिवसांपूर्वी संबंधित आमदारांना या तरुणांनी सशारा दिला होता. मात्र मुंदडांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे संतापलेल्या मराठ्यांनी आज संतप्त होत ठिय्या आंदोलन केले. बालाघाट परिसरातील कळसंबर, नेकनूर, आनंदवाडी, मांडवकेल, कारेगव्हण, वडगाव, जैताळवाडी, येळंबघाट, खडर्ड्याचीवाडी, कारेव्हण, सोनपेठसह आदी गावच्णया तरुणांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा यांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत म्हटले होते. मात्र आ. मुंदडांनी भूमिका स्पष्ट केली नाही. अकेर आज बालाघाट परिसरातील शेकडो तरुणांनी मोटारसायकल रॅली काढत प्रचंड घोषणाबाजी करत थेट मुंदडांचे निवासस्तान गाठले. मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करा, लेखी स्वरुपात पाठींबा द्या म्हणत या वेळी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती.