बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वारंवार गुन्हे करणार्यांवर एमपीडीएनुसार कारवाई करण्याचे आदेश ठाणेप्रमुखांना दिले आहेत. केज हद्दीतील विजय राजेंद्र काळे (वय 27, रा. क्रांतीनगर) हा वारंवार गुन्हे करून समाजात दहशत पसरविण्याचे काम करत होता. पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करत त्याला हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजय काळे हा वारंवार गुन्हे करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत होता. हातभट्टी दारू तयार करून तो विकत होता. त्याच्यावर असे विविध पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला लेख आणि तोंडी सांगूनही तो गुन्हेगारी वृत्ती सोडत नव्हता. त्यानंतर त्याच्यावर एमपीडीएचा प्रस्ताव सादर करून तो एसपींमार्फत केजचे ठाणेप्रमुख बाळासाहेब पवार यांनी जिल्हाधिकार्यांकडे पाठविला होता. तो मंजूर होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, स्था.गु.शा.चे प्रमुख संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केजचे ठाणेप्रमुख बाळासाहेब पवार, पो.उप.नि. पाटील, श्रीकांत चौधरी, संतोष, बाळासाहेब अहंकारे, अभिमन्यू औताडे, बप्पासाहेब घोडके, संजय जायभाये यांनी केली. येणार्या गणेशोत्सव आणि विविध सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता ठेवण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक ठाकूर यांनी केले.