नवी दिल्ली (वृत्तसेवा)- काँग्रेसचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे. मी या विधेयकाच्या समर्थनार्थ उभी असून माझ्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण आहे. निवडणुकांमध्ये महिलांचा सहभाग सुनिश्चित करणारे विधेयक माझे पती राजीव गांधी यांनी पहिल्यांदा आणले होते. आज त्याचाच परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले होते, ते या विधेयकाच्या मंजुरीमुळे पूर्ण होणार आहे, अशा भावना काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी व्यक्त केल्या.
संसद आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याबाबतचे व संसदेच्या वेशीवर गेली तब्बल 27 वर्षे रखडलेले हे विधेयक संसदेच्या याच विशेष अधिवेशनात मंजूर होण्याची अपेक्षा आहे. तूर्त काँग्रेसची साथ सरकारला लाभल्याने ते शक्यही दिसत आहे. आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत सोनिया गांधी यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करतानाच सरकारला खडे सवालही विचारले.
सोनिया गांधी म्हणाल्या काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा आहे. हे विधेयक मंजूर होणार असल्याने आम्ही आनंदी आहोत, पण चिंताही आहे. मला प्रश्न विचारायचा आहे की महिला गेल्या 13 वर्षांपासून राजकीय जबाबदारीची वाट पाहत आहेत. पण आताही त्यांना आणखी वाट पाहायला लागणार असल्याचं दिसतंय. 2 वर्षे, 4 वर्षे, 6 वर्षे, आणखी किती प्रतीक्षा करावी? हे विधेयक तातडीने मंजूर करावे, अशी आमची मागणी आहे.
मात्र जातीय जनगणना करून एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाची व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलली पाहिजेत. या विधेयकाला उशीर केल्यास महिलांवर अन्याय होईल, असं सोनिया गांधी म्हणाल्या.