मराठवाड्यामध्ये चार्याचा प्रश्न गंभीर
बीड जिल्ह्यात 7 लाख 54 हजार पशुधन
4 हजार 54 टन इतकाच जिल्ह्यात चारा उपलब्ध
बीड (रिपोर्टर): या वर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. खरीप पिकं दोक्यात आली. सोयाबीन, कापूस ही दोन्ही मुख्य पिकं 50 टक्के खराब झाली. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी नगदी पिकाकडे वळल्याने चार्याची टंचाई भासू लागली. जनावरांना मुबलक चारा उपलब्ध होत नाही. यंदाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात सद्यस्थितीत 4054 टन इतकाच चारा उपलब्ध आहे. बीड जिल्ह्यात 7 लाख 54 हजार पशूधन आहे. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात चार्याचा प्रश्न गंभीर बनला. चार्याच्या प्रश्नावर राज्य सरकार विचारविनीमय करत असल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पडला नसल्यामुळे जवळपास सर्वच धरणं कोरडी आहेत. गेल्या वर्षी सर्व धरणे पुर्णत: भरली होती. यंदाज सुरुवातीपासूनच कमी पाऊस पडला. कमी पावसावर कसेबसे खरीप पिके आली असली तरी सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. कापूस, सोयाबीन ही मुख्य पिकं 50 टक्के खराब झाली. ज्या प्रमाणात खरीप पिकांचं नुकसान झालं त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये जनावरांच्या चार्याचा प्रश्न देखील गंभीर बनला. नगदी पिकामुळे शेतकरी बाजरी, मूग, मटकी, मका इत्यादी पिकांची लागवड जास्त प्रमाणात करत नाहीत. यावर्षी चार्याचा प्रश्न गंभीर बनला. जिल्ह्यात 7 लाख 54 हजार इतके पशूधन आहे. या पशुधनासाठी सध्या उपलब्ध 4 हजार 54 टन इतकाच चारा शिल्लक आहे. पाऊस पडला नाही तर परिस्थिती गंभीर बनणार आहे. जिल्ह्यात उसाचं क्षेत्र वाढलेलं आहे. ऊस म्हणून चार्याचा उपयोग केला जाऊ शकतो. राज्य सरकारही चार्याच्या प्रश्नी विचारविनीमय करत असल्याचे दिसून येत आहे.
कडब्याचे भाव गगनाला भिडले
नगदी पिकामुळे जिल्ह्यात ज्वारीची लागवड सुद्धा अत्यंत कमी झाली. दहा वर्षांपूर्वी ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असे. ज्वारी पिकाच्या लागवडीमुळे चार्याचा प्रश्न बराच मिटत होता. मात्र गेल्या वर्षी ज्वारीचा पेरा अत्यंत कमी झाला होता. त्यामुळे ज्वारीच्या कडब्याला सध्या सोन्याचा भाव आला आहे. ज्वारीचा कडबा पैसे देऊनही मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
कपाशीने माना टाकल्या, पाते गळाले पावसाने
दडी मारल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान
यंदा सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस पडल्याने शेतकर्यांनी महागा मोलाचे बी-बियाणे खरेदी करून कपाशीची लागवड केली. मात्र मधल्याकाळात पावसाने दडी मारल्याने चांगले पीक करपू लागले. सध्या काही ठिकाणी पाते आले आहेत, मात्र ते पावसाअभावी गळून गेले. कपाशीने माना टाकल्याने दोड्याही पोसल्या नाहीत त्यामुळे कापसाच्या उत्पन्नात प्रचंड घट होणार आहे. आज जरी पाऊस पडला तरी त्याचा सरकीला कसलाही उपयोग होणार नाही.
यंदा चांगला पडेल, असा अंदाज हवामान खात्याने बांधला होता. त्याशिवाय हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनीही या वर्षी दुष्काळ पडणार नाही, असे संकेत दिले होते. मात्र जवळपास पंजाबराव डब यांच्यासह हवामान विभागाचे 90 टक्के अंदाज चुकले आहे. हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून गेल्या काही दिवसात अनेक शेतकर्यांनी कपाशीला खत पेरले आणि पाऊसच आला नाही. त्यामुळे सरकीने माना टाकल्या असून पाते पुर्णपणे गळाले आहेत. ज्या काही दोड्या लागल्या त्याही पोसल्या नाहीत. सध्या एका एका झाडाला दोन-चार दोड्या आहेत. यावरच शेतकर्याला समाधान मानावे लागणार आहे. आता जरी पाऊस पडला तरी त्याचा कपाशीला उपयोग होणार नाही. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशी परिस्थिती जिल्ह्यातील एक-दोन मंडळात नसून सर्वत्र हीच आहे.