बीड (रिपोर्टर)- पावसाळा संपत आल्यानंतरही महााष्ट्रात बहुतांशी ठिकाणी पाऊस अत्यल्प झाल्याने बीड सह राज्यातले 13 जिल्हे दुष्काळीसदृश्य परिस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर असून येणार्या काळात पिण्याचे पाणी आणि चार्याची तीव्र टंचाई उद्भवू शकते, हवामान विभागाने येत्या 8 दिवसात पाऊस येण्याची शक्यता नसल्याचे वर्तवल्याने या भागात दुष्काळ अधिक तीव्रतेने समोर येताना दिसून येणार आहे.
महाराष्ट्रात यावर्षी बोटावर मोजण्याइतके जिल्हे वगळले तर अन्य जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा प्रचंड कमी पाऊस झाल्याचे दिसून येत आहे.
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार बीडसह महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 45 टक्के पेक्षाही कमी पाऊस झाल्याचे निदर्शनास येत आहे. नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 45 टक्के, सातारा 40 टक्के, बीड 43 टक्के, जालना 43 टक्के, सोलापूर 35 टक्के, परभणी 31 टक्के, अकोला 19 टक्के, धाराशीव 32 टक्के, औरंगाबाद 27 टक्के कमी पाऊस झाला आहे. सांगली, वाशीम, हिंगोली या ठिकाणची परिस्थितीही अशीच आहे. येणार्या 8 दिवसात पाऊस येण्याची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट नव्हे तर दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे.
अशीच परिस्थिती राहिली तर येत्या आठ दिवसात बीड जिल्ह्यासह बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहणार आहे. बीड जिल्ह्यात आजमितीलाच चाराटंचाईचे संकट जाणवत असून येणार्या महिनाभरामध्ये महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चार्यासाठी शेतकर्यांना वणवण भटकावे लागणार आहे. राज्यातल्या तेरा जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.