बीड (रिपोर्टर) बेघरांना घर मिळावं हा उदात्त हेतू ठेवून शासन रमाई घरकुल आवास योजना राबवत असली तरी स्थानिक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला हाताशी धरून एकाच जागेवर एकाच कुटुंबात दोन ते चार घरकुल मिळवण्याचा धंदा जिल्ह्यात होत असल्याने गरजू लोक या योजनेपासून लांब राहत आहेत. त्यामुळे नियमानुसार घरकुलाची नोंद ही ग्रामपंचायतीच्या पीटीआरवर ग्रामसेवकांनी करावी, असे आढळून न आल्यास तहसीलदारांसह जिल्हाधिकार्यांनी संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बेघरांना घर मिळावं यासाठी शासनाने विविध योजनेअंतर्गत घरकुल द्यायला सुरुवात केली आहे. रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत अनेकजण जागेचा पीटीआर घेऊन संबंधित योजना आपल्या घरात आणत आहेत. घरकुल मंजूर झालेल्या व्यक्तींना त्याची नोंद ग्रामपंचायतीच्या पीटीआरवर करणे बंधनकारक आहे, परंतु अवैध मार्गाने पैसे घेण्यास सोकलेल्या ग्रामसेवकांनी यावर मार्ग काढत एकाच कुटुंबात दोन ते चार घरकुल देण्यासाठी आणि त्यातून पैसे कमवण्यासाठी घरकुलाची नोंद पीटीआरवर करत नसल्याचे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. ज्यांना गेल्यावर्षी घरकुल मिळाले आहे त्या लोकांनी त्याच पीटीआरवर यावर्षीही ग्रामसेवकाच्या संगनमताने घरकुल मिळवल्याच्या अनेक घटना बीड तालुक्यात आणि जिल्ह्यात पहावयास मिळतात. सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर आणि खर्या गरजुंना योजनेपासून लांब ठेवणारे आहेत. त्यामुळे दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणात लक्ष घालून लाचखोरीत सोकलेल्या ग्रामसेवकांना धडा शिकवत घरकुल मंजूर झाल्यानंतर त्याची नोंद तात्काळ ग्रामपंचायतीच्या पीटीआरवर करण्याचे सक्त आदेश द्यावेत, जो ग्रामसेवक असं करत नाही त्याला तात्काळ निलंबीत करावं, त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या लोकांना घरकुल मंजूर झाले आहे आणि त्याच घरातील लोकांच्या अन्य नातेवाईकांना घरकुल यावर्षी मंजूर झाले असेल तर तेव्हाचे पीटीआर आणि आजची पीटीआर तपासावी, तेव्हा शेकडो नव्हे तर हजारो घरकुल जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबात डबल गेल्याचे दिसून येईल.