सचिन मुळूक यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील समाजाचे प्रश्न आपल्या माध्यमातून मांडा, ते सोडविण्याचा नक्की प्रयत्न करू. तसेच जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. मुळूक यांनी जाहीर समर्थन दिलेल्या भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. एकनाथ शिंदे म्हणाले, आपली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील पदाधिकार्यांना लवकरच भेटणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे बीडचे तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर, उद्योजक बाजीराव चव्हाण आदी उपस्थित होते.
सचिन मुळूक यांचा धाडसी निर्णय
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी धाडसी निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे जाहीर केले. अशी जाहीरपणे भूमिका मांडणारे सचिन मुळूक हे मराठवाड्यातील पहिले पदाधिकारी ठरले. सचिन मुळूक यांच्या संपर्कात असलेल्या जिल्ह्यातील इतर पदाधिकार्यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच भेटणार आहेत, अशी अधिकृत माहीती मिळाली आहे.