गणेश मंदिर परिसरात घडली आज सकाळी घटना
केज (रिपोर्टर): आजोबा आणि नातवामध्ये संपत्तीचा वाद विकोपाला गेला. देवदर्शन करून परत येणार्या आजोबावर नातवाने धारदार शस्त्राने सपासप वार करत खून केला. ही खळबळजनक घटना कानडी रोडवरील सिद्धीविनायक गणेश मंदिराच्या परिसरात घडली. आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने पोलिसांना आपण आपल्या आजोबाचा खून केल्याची माहिती दिली. या प्रकरणी त्याच्या विरोधात केज पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गिरधारी किसनलाल शिल्लक यांचा नातू रोहीत रतन शिल्लक यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून संपत्तीचा वाद होता. या वादातून त्यांच्यात नेहमी भांडणही होत होते. आज सकाळी गिरधारी शिल्लक हे कानडी रोडवर असलेल्या सिद्दीविनायक गणेश मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते मंदिराच्या परिसरात आले असता बाहेर दबा धरून बसलेला त्यांचा नातू रोहीत रतन शिल्लक याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यात व मानेवर सपासप वार केले. यात ते गंभीररित्या जखमी झाले. वार इतके गंभीर हाते की, त्यांच्या डोक्याची कवटी फुटली होती. यात ते जागीच ठार झाले. त्यानंतर नातू रोहीत शिल्लक हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला व आपण आपल्या चुलत आजोबाचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी त्याच्या विरोधात कलम 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.