मुंबई (रिपोर्टर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरू ठेवला. केेंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते सहभागी झाले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली असून दोन टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येते. या विस्तारात कोणाची वर्णी मंत्रिमंडळात लागणार यावर राज्यभरात चर्चा सुरू झाली असून बीड जिल्ह्यातून गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या नावाची चर्चा होत असतानाच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार काय? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेतून बंड करून आलेल्या एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांच्या मदतीने भाजपाने राज्यात सत्तास्थापन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आज दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारत राज्याचा कारभार हाती घेतला आहे. पहिल्याच दिवशी निर्मला सितारामण यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीस मुख्यमंत्री सहभागी झाले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला त्यांच्या दालनामध्ये गेले होते. सदरची भेट ही नेमकी कशासाठी होती? हे समजू शकले नसले तरी या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर महत्वपुर्ण चर्चा होणार असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. या विस्तारामध्ये बीडमधून गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या नावाची चर्चा होत असून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार का? याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. आतापर्यंत पंकजा मुंडे यांना दोन ते तीन वेळा डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक एकीकडे नाराज असताना या आलेल्या नव्या संधीत पंकजा मुंडेंचं सोनं केलं जाणार का? याकडे समर्थकांसह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.