बीड (रिपोर्टर) माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकाला वाळूमाफियांनी चांगलीच दमदाटी करत त्यांच्या चार चाकी गाडीला ट्रॅक्टरची धडक देवून वाळूने भरलेला ट्रॅक्टर पळून नेल्याची घटना रात्री काळेगाव शिवारात घडली. या प्रकरणी मंडळअधिकार्याने दिलेल्या फिर्यादीवरुन माफियांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि त्याची वाहतूक केली जाते. या विरुध्द कारवाई करण्यासाठी मंडळाधिकारी रोहिदास बांगर हे आपल्या पथकासह दि. 7 जुलै रोजी काळेगाव शिवारात गेले असता तेथे वाळू माफिया सिध्देश्वर बरडे, सुभाष कचरे, सचिन मेडके, अमोल कचरे, योगेश तौर, सुभाष करे, व इतर 4 ते 5 लोक नाव गाव माहित हे ट्रॅक्टरमध्ये वाळू घेवून जात असतांना मंडळअधिकारी आणि त्यांच्या पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र माफियांनी दमदाटी करुन ट्रॅक्टर महसूल पथकाच्या गाडीवर घालून सरकारी गाडीचे नुकसान केले. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात मंडळअधिकार्याने दिलेल्या फिर्यादीवरुन माफियांविरुध्द कलम 353, 379,143,427,504, भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.