संबंधित खात्यांना सूचना
बीड (रिपोर्टर) गेल्यावर्षी सारखा याही वर्षी पाऊस झाला तर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. ज्या ठिकाणी तलाव फुटण्याची भीती आहे तेथील लोकांना भविष्यात सुरक्षितस्थळी हलवायचे असेल तर त्याचेही नियोजन आत्ताच करावे. आजच्या तारखेमध्ये बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. काही प्रमाणात असाच पाऊस कमी राहिला तर काही ठिकाणी पुन्हा पेरणी करावी लागेल का? हीही बाब प्रशासनाने ध्यानी घ्यावी. शेतकर्यांना खते कमी पडणार नाहीत, अव्वाच्या सव्वा दराने या खतांची विक्री होणार नाही याकडेही लक्ष द्यावे आणि सर्व शासकीय यंत्रणेमध्ये समन्वय असायला हवा, याचे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
राज्याच्या प्रशासनातील प्रधान सचिव असलेले आणि बीडचे पालक सचिव असलेले विजय वाघमारे हा प्रशासनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी सर्वच शासकीय यंत्रणेच्या खातेप्रमुखांना या आढावा बैठकीस बोलवले होते. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस अधिक्षक ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेत काही ठिकाणी शासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत. यामध्ये भविष्यामध्ये गेल्यावर्षी सारखाचा बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर जे धोक्याचे तलाव आहेत त्यांची पाहणी करावी, ते तलाव फुटणार नाहीत, सोबतच धोक्याच्या ठिकाणी असलेल्या वस्ती सुरक्षित ठिकाणी हलवायचे असतील तर त्याचे नियोजनही जिल्हा प्रशासनाने आतापासूनच करावे, आज तरी बीड जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काही प्रमाणात दुबार पेरणी करावी लागेल का, याचेही नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी दुकानदार काही खतांची कृत्रिम टंचाई करतात, शेतकर्यांना अव्वाच्या सव्वा दराने खते विकतात त्यामुळे शेतकर्यांना खते कमी पडतात. शेतकर्यांना खते कमी पडले नाही पाहिजेत याचेही नियोजन प्रशासनाने करावे. आतापर्यंत झालेल्या पिककर्जाचे वाटप याचा आढावा घेत पीककर्ज वाटपाची गती वाढवण्याचे आदेश अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना या वेळी विजय वाघमारे यांनी दिले. सर्वच शासकीय यंत्रणेने आपआपसात समन्वय ठेवून काम करावे, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे यांनी प्रशासनाला दिले. या वेळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, सामान्य प्रशासन विभागाचे जगताप, सर्व खातेप्रमुख या आढावा बैठकीला उपस्थित होते.
पालक सचिवांकडून जिल्हाधिकार्यांचे कौतुक
आजपर्यंत सर्व शासकीय यंत्रणेमध्ये उत्तम समन्वय जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी ठेवलेला आहे. सर्व यंत्रणेंचे अहवाल उत्कृष्ट आहेत. वेलडन राधाबिनोद, असे म्हणत पालक सचिव वाघमारे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे कौतुक करत निरोप घेतला.