बीड (रिपोर्टर): मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात एक कोटीची लाच मागणार्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर घरात तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त नगदी रक्कम मिळून आल्यानंतर आता हरीभाऊ खाडेच्या लाचखोर लिलांची चर्चा होत असून जेवढ्या मल्टिस्टेट प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत तेवढ्यांकडून हा खाडे मोठ्या प्रमाणावर हप्ता घ्यायचा. एका मल्टिस्टेटकडून तर गुन्हा न दाखल करण्याबाबत आणि अटक न करण्याबाबत रोज हप्ता घेत असल्याचेही बोलले जात आहे. मल्टिस्टेट आणि ठेवीदारांच्या बैठकीत या खाडेने भाषणही ठोकले होते. नव्हे नव्हे तर ठेवीदारांना दाबदडप केल्याचेही बोलले जात आहे.
बीड पोलीस दलाचे लक्तरे वेशीला टांगणारी वस्तूस्थिती परवा समोर आली. आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडे याच्या विरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला. तब्बल एक कोटीची लाच मागून 30 लाखाच्या तडजोडीत 5 लाखाची रक्कम खाडेच्या हस्तकराने स्वीकारली होती. लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी काल त्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर घरामधून नगदी 1 कोटी 8 लाख रुपयांची रक्कम मिळून आली तर मोठ्या प्रमाणावर सोनंही सापडलं. घरात एवढी मोठी रक्कम पाहता आणि सहा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता पाहता खाडेंनी गेल्या काही महिन्यात घोटाळेबाज मल्टिस्टेटच्या अध्यक्षासह संचालकांकडून हप्ते घेतल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. एवढेच नाही तर एका मल्टिस्टेटकडून त्याला रोज पैसे येत असल्याचेही बोलले जात आहे. हा खाडे ठेवीदारांवर दाबदबावही टाकत असल्याचे आता दबक्या आवाजात बोलले जात आहे. काही ठेवीदार खाडेंनी त्यांच्या सोबत केलेल्या वर्तनाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यानां सांगितल्यानंतरही अधिकार्यांनी खाडेला कुठली समज दिली नसल्याचे बोलले जाते. एवढेच नव्हे तर एका मल्टिस्टेट अध्यक्षाची आणि ठेवीदारांची जिल्हाबाहेर बैठक झाली. त्या बैठकीत खाडे उपस्थित होता. तिथे त्याने भाषणही ठोकले, परंतु ते मल्टिस्टेटच्या अध्यक्षाला पैसे देण्याबाबत नव्हे तर ठेवीदारांना दाबदडप करणारे असल्याचेही आता समोर येत आहे. सध्या खाडे आणि त्याचा साथीदार जाधवर हा फरार असून या दोघांना ताब्यात घेण्यासाठी संभाजीनगरवरून दोन पथक तयार करण्याचे आल्याचे सांगण्यात येत आहे. खाडे आणि जाधवर यांच्याबाबत कुणाला माहिती असेल तर त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले जात आहे.
लाच घेतली तेव्हा खाडे कुठे आणि कुणासोबत होते?
परवा खाडेच्या हस्तकाने लाच घेतली, तो त्या दिवशी पुण्याला असल्याचे कळते, परंतु तो कुणासोबत होता? सुत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकार्याच्या मुलांचे शैक्षणिक काम करण्यासाठी तो गेला होता. त्यासोबत वरिष्ठ अधिकार्याची पत्नी व मुलगी सोबत असल्याची चर्चा आहे. तो अधिकारी कोण? संबंधित वरिष्ठ अधिकार्याने खाडे आणि त्यांच्यात जे भ्रमणध्वनी संवाद झाले त्याचं कॉल रेकॉर्डही डिलिट केल्याचे बोलले जाते. पोलिसांकडे सायबर यंत्रणा असल्याने ते शक्य आहे, आता या दिशेनेही तपास व्हायला हवा.