गणेश सावंत
स्वजातीचा आणि स्वधर्माचा अभिमान, गर्व बाळगणे हा प्रत्येकाचा नक्कीच नैतिक अधिकार आहे, परंतु परधर्म, परजातीचा तिरस्कार करणे हा कुणच्याही व्यक्तीला नैतिक अधिकार नाही. हे सर्वश्रूत असताना केवळ सत्ताकारणाचे गणित जुळवणार्या लबाड राजकारण्यांच्या जाळ्यात अडकलेले सर्वच जातीचे पोरं जेव्हा स्वजातीचा गर्व बाळगतात आणि दुसर्या जातीला हिन समजतात तेव्हा जातीयवादासारखी विषवल्ली एखाद्या विषारी वृक्षासारखी फोफावयाला लागते आणि तिथेच माणूस धर्माची हत्या होते. त्याच माणूस धर्माची हत्या सर्रासपणे गावागावात आज होताना दिसतेय. दुर्दैव याचं वाटतं, जगाच्या पाठीवर ज्या स्वाभिमानी महाराष्ट्राला भुगोलाबरोबर इतिहासाची श्रीमंती आहे, साधू-संत सुफींचे मार्गदर्शन आहे, समाजसुधारकांची दिशा आहे आणि लढवय्या बाण्यातून क्रांती घडवणारा थरारक इतिहास आहे, त्याच महाराष्ट्राच्या मातीत माणूस माणसापासून दुरावतोय. मंद बुद्धी असलेल्या स्वधर्म, स्वजातीचा अभिमान बाळगणार्यांना आणि गावागावात जातीय तेढ निर्माण करणार्यांवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे जे कटाक्ष हवय, ते कटाक्ष पहायला मिळत नाही तेव्हा समाजातल्या सुजान नागरिकांनी जात-पात-धर्म-पंथाच्या ओकार्या काढणार्यांचे नाक दाबण्यासाठी समोर येणे महत्वाचे आहे.
अरे हा महाराष्ट्र कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांचा, शंभू राजेंचा, शाहू-फुले-आंबेडकर पासून नगदनारायण, भगवानबाबांचा. हा महाराष्ट्र जगद्गुरू संत तुकोबांपासून संत ज्ञानेश्वरांपर्यंत नामदेवांपासून जनाईपर्यंतचा. मग तरीही या महात्म्यांनी, या समाज सुधारकांनी जातीभेद अमंगळ हे सांगितलेले असतानाही आज माझीच जात सर्वश्रेष्ठ म्हणत दुसर्या जातीचा द्वेष का केला जातोय? जातीयवाद ही महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी किड आहे. आणि ही किड जेव्हा गावागावात पसरेल तेव्हा त्या गावातले एक तरी कुळ पवित्र राहील का? जगद्गुरू संत तुकोबा म्हणतात, ते कुळ आणि तो पावन देश कोणता तर जेथे हरीचे दास जन्म घेतात, तो देश पावन. अन् इथं पदोपदी हरीच्या दासांनी जन्म घेतलाय. म्हणून तर
अंत्यजादी योनी तरल्या हरभजनी
म्हणत या महाराष्ट्रात प्रत्येक जाती-धर्मात थोर संत होऊन गेल्याचे तुकोबांनी एका अभंगात स्पष्ट केले, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म-धर्म त्याचे झाला नारायण, त्याचेनी पावन तिन्ही लोकं, वर्ण अभिमाने कोण झाले पावन ऐसे द्या सांगून मझपाशी, वर्णाचा, जातीचा अथवा धर्माचा अभिमान बाळगत दुसर्या धर्माला तुच्छ लेखणारा असा कुठला व्यक्ती पावन झाला, ते मला सांगा, असे तुकोबा ठणकावून सांगतात. एवढेच नव्हे तर या अभंगात वैषतुळा धारा गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहीदास, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जान विष्णूदास, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी, चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी, नामियाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरी राव तेयसवे । मैराळ जनक कोण त्याचे कुळ। महिमान तयाचे काय सांगू, यातायाती धर्म नाही विष्णूदासं॥ या अभंगातून तुकोबांनी स्पष्टपणे ज्या कुळात, ज्या देशात हरीचे दास जन्म घेते, ते कुळ धन्य होते, तो देश पावन होतो, परंतु जो स्वजातीचा अभिमान बाळगत दुसर्या जातीला तुच्छतेने लेखतो तो
रांजणीही जळ
अशा दबक्यातल्या संकुचीत विचारसरणीचा असतो. म्हणजे, विशाल समुद्राचे पाणी जसे चांगले – वाईट पहात नाही मात्र त्याच समुद्राच्या पाण्याला एखाद्या डबक्यात भरले आणि बाजुला ठेवले तर त्याचे काहीच महत्व नसते. तसेच माणूस धर्मातून स्वत:च्या जातीला अभिमानाने, गर्वाने बाजुला ठेवत दुसर्या जातीवर जो कोणी अवहेलनेने भाष्य करतो तेव्हा त्याच्याच जातीचे कुणी उरत नाही, हे स्पष्टतेने साधू-संतांनी सातत्याने म्हटले. त्यासाठी गंगा न देखे विटाळ । तेची रांजणीही जळ। अल्पमहदा नवे सरी विटाळ तो भेदकरी । काय खंडली भूमिका वर्णाने पायरीका लोका । तुका म्हणे, अगेविण बीज वेगळे तो भिन्न । गंगेच्या प्रवाहातील पाण्याला विटाळ नसतो परंतु तोच पाणी एखाद्या भांड्यात भरून ठेवले तर ओहोळ्या सोहळ्यात त्याला कोणी स्पर्श केला तर ते विटाळते. असा समज आहे. परंतु माणूस जन्मास आल्यानंतर खळखळ निखळ वाहणार्या गंगेसमान तुम्हाला राहायचं आहे की, एखाद्या डबक्यातल्या सडक्या पाण्याप्रमाणे तुम्हाला तसेच पडून राहायचे आहे हे आता ज्याने त्यानेच ठरवावे. महाराष्ट्रात जेवढे साधू-संत झाले, तेवढेच बीड जिल्ह्यातही होऊन गेले, म्हणूनच
बीड हा गडांचा आणि संतांचा जिल्हा
हे कोणीही नाकारणार नाही. इथे संत ज्ञानेश्वरांच्या आजोबांची समाधी. इथेच आहे नगदनारायणांचा गड, इथेच आहे विसाव शतकातील थोर संत भगवानबाबांचा गड, इथे आहे, माऊलींची समाधी आणि पदोपदी समाज सुधारकांचे वास्तव्य असलेला हा जिल्हा. मग तरीही इथे अचानक जातीयवादाचे बीज का उगते? कधी हिंदू-मुसलमान, कधी दलित-सवर्ण तर कधी मराठा-वंजारा हा वाद बारकाईने समजून घेतला तर आजपर्यंत जेवढे जातीयवादातून झगडे झाले त्यातला खरा झगडा हा राजकारण्यांशी मिळता जुळता झाल्याचे समोर आले. सत्ताकारणाच्या गणितामुळे जर जाती-पातीचा आणि जाती-पातीतील माणसाचा वापर होत असेल तर तो सर्वश्रेष्ठ माणूस धर्मासाठी हानीकारक आहे अशा वेळी होय, मला माझी जात-धर्म प्रिय आहे. मला त्याचा अभिमान नव्हे तर गर्व आहे हे छातीठोकपणे सांगा, परंतु माझ्या धर्माप्रमाणे, जातीप्रमाणे अन्य जाती-धर्मांचा मी आदरच करेल, असे जेव्हा प्रत्येक जण म्हणेल तेव्हा सत्ताकारण करणार्यांच्या गुडगुडीतले गणिते जुळणार नाहीत, त्यामुळे पोरांनो, आपले टाळके सांभाळा. टाळक्यांचा टोळक्यात वापर होणार नाही याची दक्षता घ्या आणि साधू-संतांसह समाज सुधारकांनी भविष्यासाठी दिलेल्या पायवाटेतून मार्गस्थ होत स्वत:च्या भवितव्याची पताका फडकवा.