बलात्काराच्या गुन्ह्याबरोबर राजकीय करिअर संपविण्याचीही धमकी
धोंडेंच्या पीएने 25 हजार दिले; दोन महिलांसह एकावर नगरमध्ये गुन्हा
जिल्ह्यात खळबळ
बीड/आष्टी (रिपोर्टर): भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना दोन महिलांसह एका व्यक्तीने अश्लिल क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून या प्रकरणी दस्तुरखुद्द भीमराव धोंडेंनी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून दोन महिलांसह एका व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत धोंडेंनी पीए मार्फत 25 हजार रुपये दिल्याचेही स्पष्टपणे म्हटले आहे. आरोपींनी धोंडेंना अश्लिल क्लिप व्हायरल करण्याबरोबर बलात्काराचा गुन्हा दाखल करू आणि तुमचं राजकीय करिअर संपवून टाकू, अशी धमकीही दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात खळबळ उडवून देणार्या या घटनेची माहिती अशी की, आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपाचे नेते भीमराव धोंडे यांना अहमदनगर येथील कल्पना सुधीर गायकवाड, दुसरी बांगर नावाची महिला व इस्माईल दरियानी ऊर्फ भैय्या बॉक्सर यांनी संगनमत करून ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले आहे. या तिघांनी धोंडे यांना ‘तुमचा अश्लिल व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो सोशल मिडियावर प्रसारीत करून तुमची बदनामी करू, त्याचबरोबर तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करत तुमची राजकीय कारकिर्द संपवून टाकू, हे होऊ द्यायचे नसेल तर एक कोटी रुपयाची व्यवस्था करा,’ एक कोटीच्या खंडणीची मागणी झाल्यानंतर धोंडे यांच्या स्वियसहाय्यका मार्फत इस्माईल दरियानी ऊर्फ बॉक्सर याने 25 हजार रुपये स्वीकारल्याचेही सांगण्यात येते. घटनेचे गांभिर्य पाहून भीमराव धोंडे यांनी अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्या तक्रारीवरून कल्पना गायकवाड, बांगर (महिला) व इस्माईल दरियानी याच्या विरोधात गु.र.नं. 766/2024 भा.दं.वि. कलम 384, 385, 388, 34 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खंडणी आणि ब्लॅकमेलिंग गेल्या सहा महिन्यांपासून होत असे. अहमदनगरच्या हॉटेल रॉयलमध्ये आणि आष्टी येथील धोंडेंच्या संपर्क कार्यालयात येऊन खंडणीखोर धोंडेंकडे सातत्याने अश्लिल क्लिप आपल्याकडे असल्याची धमकी देत होते. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.