बीड (रिपोर्टर): स्वराज्य अभियंता हिरोजी इंदोलकर पुरस्काराने सन्मानीत झालेले बीडचे भूमिपुत्र इंजिनिअर जितेंद्र लक्ष्मणराव भोपळे यांची राज्य शासनाने उपसंचालक पदावरून संचालक नगर रचनाकार तथा मुख्य नियोजनकार पदी पदोन्नती केली आहे. नगरविकास खात्याकहून इंजिनिअर जितेंद्र भोपळे यांच्या कार्याची ही सर्वात मोठी दखल मानली जाते.
बीड येथील मुख्य रहिवासी इंजिनिअर जितेंद्र लक्ष्मणराव भोपळे हे नगरविकास खात्यात गेल्या कित्येक वर्षांपासून सेवा देत आहेत. कर्तव्य-कर्माला महत्व देत जितेंद्र भोपळे यांनी आजपर्यंत कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची गंभीर दखल यापूर्वी राज्य शासनाने घेतली. त्यांना 2023 साली स्वराज्य अभियंता हिरोजी इंदोलकर हा पुरस्कार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भोपळे हे नगरविकास खात्यामार्फत तेव्हा उपसंचालक पदावर कार्यरत होते. आता भोपळे यांची राज्य सरकारने पदोन्नती केली आहे. संचालक नगररचना तथा मुख्य नियोजनकार म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. मराठवाड्यात सर्वात उंचीचं पद हे भोपळे यांना मिळाल्याने बीड जिल्ह्याच्या यशात हा मानाचा तुरा मानला जातो.