परळी (रिपोर्टर): परळी शहरात काल रात्री झालेल्या गोळीबार आणि हत्या प्रकरणात अखेर रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते सह अन्य चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळीच्या गोळीबार प्रकरणाने शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सध्या शहरात तणावपुर्ण शांतता असून जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर हे परळीत तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे रात्रीचा गोळीबार आणि हत्या प्रकरण नेमके कशामुळे घडले? याचा उलगडा आता झाला असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातल्या बँक कॉलनीत थरारक घटना घडली. गोळीबारामध्ये मरळवाडी येथील सरपंचाची हत्या झाल्याची माहिती जिल्हाभरात पसरल्याने एकच खळबळ उडाली. सदरची घटना का आणि कोणी केली? यावर चर्चा होत असताना अखेर रात्री उशीरा या घटनेचे सत्य बाहेर आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते यांनी गोळीबार करत हत्या घडवून आणल्याचे जखमीच्या फिर्यादीवरून स्पष्ट झाले. रात्री यातील आरोपी महदोव गिते याच्या बँक कॉलनी येथील घरी मरळवाडी येथील सरपंच बापुराव बाबूराव आंधळे यांना बोलावून घेण्यात आले होते. त्या ठिकाणी बापुराव आले असता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष शशीकांत पांडुरंग गिते ऊर्फ बबन गिते यांनी शिवी देत ‘तू पैसे आणलेस का?’ असे विचारले असता बापुराव यांनी आईवर शिव्या देऊ नका, असे म्हणताच बबन गिते व बापुराव यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यावेळी गितेंनी स्वत:च्या कमरेला लावलेले पिस्टल काढून थेट बापुरावच्या डोक्यात गोळी घातली. त्याचवेळी यातील आरोपी राजाभाऊ नेहरकर याने स्वत:च्या हातातील कोयत्याने मयत बापुराव आंधळेंच्या डोक्यात वार केले. त्यामुळे ते जागीच ठार झाले
तर यातील महादेव गिते याने स्वत:च्या पिस्टलमधून एक गोळी झाडल्याने ती फिर्यादी तथा या घटनेतील जखमी ग्यानबा ऊर्फ गोट्या मारुती गिते याच्या छातीत आरपार घुसली. फिर्यादी यास तात्काळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जखमी ग्यानबा ऊर्फ गोट्या मारुती गिते यांच्या फिर्यादीवरून आरोपी शशीकांत ऊर्फ बबन गिते, मुकुंद ज्ञानेश्वर गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्या विरोधात गु.र.नं. 105/2024 कलम 302, 307, 120 (ब), 326, 323, 143, 148, 149, 504, 506 भा.दं.वि.सह सहकलम 3/25, 4/25, शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना अत्यंत गंभीर असल्याने रात्रीपासून जिल्हापोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर हे परळीत तळ ठोकून आहेत. शहरात सध्या तणावपुर्ण शांतता आहे.