बीड (रिपोर्टर): ठेवीदारांची फसवणूक करणार्या सर्व मल्टिस्टेट बँकांची एसआयटीमार्फत चौकशी करा, संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करा, सर्व संचालकांना अटक करा, अशा एक ना अनेक घोषणा देत बीड जिल्ह्यातील विविध मल्टिस्टेट बँक सोसायट्या आणि अर्बन बँकांकडून फसवला गेलेला ठेवीदार आज रसत्यावर उतरला आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी रस्ता रोखून धरला. काही काळ रस्ता रोखल्याने या भागातील मुख्य वाहतूक ठप्प झाली होती. मात्र नंतर काही वेळात पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलक ठेवीदारांचे निवेदन स्वीकारले.
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी, जिजाऊ, शुभकल्याण, मातोश्री, लक्ष्मीमाता, मराठवाडवाडा, परळी पिपल्स या मल्टिस्टेट सोसायट्या व अर्बन बँकांनी मराठवाड्यातील लाखो ठेवीदारांच्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी लुबाडल्या. मल्टिस्टेट सोसायट्या आणि या अर्बन बँका बुडीत निघाल्या. यातील बहुतांशी सोसायटींच्या चेअरमन, अध्यक्षांनी लोकांच्या पैशातून स्वत:चे मोठमोठे व्यवसाय उभारले. आलिशान गाड्या खरेदी करून मौजमजा केली. गेल्या कित्येक दिवसांपासून ठेवीदार आपल्या ठेव्यांसाठी आंदोलन करत आहेत, मात्र ठेवीदारांच्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. ठेवीदार कृती समितीच्या वतीने सचीन उबाळे हे उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावलेली आहे तर दुसरीकडे आज सकाळी ठेवीदारांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. ठेवीदार मोठ्या प्रमाणात आक्रमक दिसून आले.