शिंदेची 38 कोटीची मालमत्ता जप्त केली -पांडकर
बीड (रिपोर्टर): ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम यासह इतर मल्टिस्टेटमध्ये ठेवीदारांचे अडकलेले पैसे द्यावे, संचालक मंडळाला अटक करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी सचीन उबाळे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज प्रशासकीय अधिकार्यांनी त्यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सर्व मागण्या लवकर सोडवू, असे आश्वासन दिल्यानंतर उबाळे यांनी उपोषण मागे घेतले. संचालक मंडळाच्या अटकेसाठी शंभर पोलिसांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी गोल्डे यांनी दिली आहे.
ज्ञानराधा, साईराम, मॉ साहेब यासह इतर मल्टिस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. ठेवीदारांच्या ठेवीसाठी सचीन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांची अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचीन पांडकर,उपविभागीय अधिकारी जाधव मॅडम, डीवायएसपी गोल्डे, तहसीलदार हजारे यांनी भेट घेतली. उपोषणकर्त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन प्रशासकीय अधिकार्यांनी दिल्यानंतर उबाळे यांनी उपोषण मागे घेतले. या वेळी डीवायएसपी तथा तपासी अधिकारी गोल्डेे म्हणाले की, सर्व संचालक मंडळाच्या अटकेसाठी पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शंभर पोलीस कर्मचार्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. तर पांडकर म्हणाले की, उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या लवकर पुर्ण केल्या जातील. शिंदे याची 38 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले.