बीड (रिपोर्टर): जिल्हा परिषदेमधून ग्रामीण विकासाची अनेक शासकीय प्रस्तावांना मंजुरी या ठिकाणावरून मिळते. अनेक कामांची केंद्रस्थान हे जिल्हा परिषद असते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वगळता इतर खातेप्रमुख मात्र नेहमी आपल्या जागेवर बसत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेले सरपंच व नागरिकांना आपले काम न करताच रिकाम्या हाताने परतावे लागते.
बीड जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संगीतादेवी पाटील या काम पाहत आहेत. त्या आपल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कक्षेत आणि सीईओ यांच्या व्हिसी चेंबरमध्ये बसलेल्या असतात. मात्र इतर खातेप्रमुख हे दौर्याचे कारण सांगून कधी बाहेर गावी जातात तर कधी घरुनच आपले कामकाज हाकतात. मुख्य वित्त तथा लेखाधिकारी हे लोकसभेच्या खर्च जुळवणीत व्यस्त आहेत. त्याचा अहवाल निरीक्षकांना द्यायचा म्हणून ते इतरत्र बसून कामकाज करतात. तर जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता 1 आणि 2 व शिक्षणाधिकारी हे नेहमी गायबच असतात. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व खातेप्रमुखांना तंबी देत सर्व खातेप्रमुखांसह पुर्ण वेळ कर्मचार्यांना कार्यालयात बसण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अनेक सरपंच आणि नागरिकांनी केली आहे.