नेकनूर जवळील घटना; एक फौजदार जखमी
नेकनूर (रिपोर्टर): राज्यात हीट अॅन्ड रनच्या घटना सुरुच असून रात्री वरळीत भरधाव बीएमडब्ल्यूने एका महिलेला चिरडल्यानंतर आज सकाळी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी बीडकडे येत असताना पोलीस अधिकार्यांच्या मोटारसायकलला स्विफ्ट कारने जोराची धडक दिली. या अपघातात एक अधिकारी ठार तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला. ही घटना सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान नेकनूरजवळील नन्नवरे वस्ती परिसरात घडली. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदरची घटना एका मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. अपघात होताच कारचालक फरार झाला आहे.
बीड येथे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. फिजिकल झाल्यानंतर आज लेखी परीक्षा होती. त्यासाठी 1724 परीक्षार्थ्यांची परीक्षा होती. या परीक्षेच्या बंदोबस्तासाठी तालुक्यातील अधिकार्यांना बोलवण्यात आले होते. सिरसाळा आणि दिंद्रुड येथील पोलीस अधिकारी मोटारसायकल (क्र. एम.एच. 23 ए.के. 9397) यावर सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बीडकडे येत होते. नेकनूर जवळ त्यांच्या मोटारसायकलला स्विफ्ट कार (क्र. एम.एच. 23 – बी.सी. 2108) ने जोराची धडक दिली. या अपघातात सिरसाळा पोलीस ठाण्याचे पीएसआय रमेश धोंडीराम नागरगोजे, व दिंद्रूड ठाण्याचे पीएसआय मच्छिंद्र श्रीधर नन्नवरे हे गंभीर जखमी झाले. या दोघांना बीड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान श्रीधर नन्नवरे यांचे निधन झाले असून रमेश नागरगोजे यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने पोलीस दलामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.