बीड (रिपोर्टर): राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया मुंबईतील रुग्णालयात झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशिरा रुग्णालयात येऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईक चौकशी केली. मुंडेंना गेल्या अनेक दिवसांपासून पित्त व पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र सततचे दौरे, सभा, कामकाज यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष केले जात होते. पोटदुखीचा त्रास अधिक वाढल्याने शस्त्रक्रिया करावी लागली.
मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात मुंडेंच्या पित्ताशयावर डॉ.अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी (ता.24) त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर शुक्रवारी (ता.26) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असुन, डॉक्टरांनी आणखी चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती व पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंडेंच्या तब्येतीची दूरध्वनीवरून विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात येत मुंडेंची भेट घेतली. त्यांच्या सोबत चर्चा करत प्रकृतीची काळजी घेण्याबाबत त्यांना सल्ला दिला.