लातूर (रिपोर्टर): ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत असलेले वंचीत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे यांची भेट आज सकाळी 11 वाजता झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर काही काळ त्यांनी चर्चा केल्याचेही सांगण्यात येते. आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्यात वातावरण तापलेलं असताना ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेत असलेल्या दोन पक्षातील नेत्यांची भेट आणि त्यातील चर्चा महत्वाची मानली जातेय.
वंचीत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे काल ओबीसी आरक्षण बचाव यात्रा घेऊन लातुरात होते. काल तेथील कार्यक्रम आटोपून मुक्काम केल्यानंतर ते आज सकाळी बीडकडे रवाना झाले तेव्हा लातूर आणि बीडच्या सीमेवर महापूर नावाचे गाव आहे, त्याठिकाणी प्रकाश आंबेडकर हे तेथील लोकांशी संवाद साधत होते. याच दरम्यान भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे या लातूरकडे कार्यक्रमासाठी जात होत्या. या दोघांची महापूर येथे भेट झाली. दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर दोघात काही काळ चर्चाही झाली. मुंडे-आंबेडकरांच्या या भेटीबरोबर त्यांच्यात झालेल्या चर्चेला सध्या अधिक महत्व आहे, कारण राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आहे.